चंद्रपूर : महान्यूज लाईव्ह
सन २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात केलेली दारुबंदी उठविण्याची सरकारने प्रक्रिया सुरू केली. काही महिन्यांपूर्वी ती उठवली आणि आज पासून प्रत्यक्षात दारुविक्रीला सुरवात झाली.. आज दुकाने सुरू झाली.. तळीरामांच्या गर्दीने दुकाने फुलली.
राज्यातील तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याला आदर्श ठरेल असा निर्णय मागील सरकारच्या काळात घेतला आणि चंद्रपूर हे दारुबंदीचे पहिला जिल्हा ठरले. मात्र महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी ही फसवी असून प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांची दारु जिल्ह्यात चोरट्या मार्गाने विकली जाते आणि त्यातून गुन्हेगार तयार झाले आहेत अशी टिप्पणी करीत सरकारकडे दारूबंदी उठविण्याचा आग्रह धरला. परिणामतः सरकारने दारुबंदीचा जिल्हा मुक्त केला.
आज उत्पादन शुल्क खात्याने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार प्रत्यक्षात दारु दुकाने सुरू झाली. जिल्ह्यातील ९९ दुकानांचे परवाने खात्याने कार्यान्वित केले होते. त्यानुसार ती दुकाने आजपासून सुरू झाली. विशेष म्हणजे यात एकमेव वाईन शॉप आहे. सर्वाधिक संख्या बियरबारची असून ६५ बिअरबार व २६ देशी दारु दुकाने व ६ बिअर शॉपींचा यामध्ये समावेश आहे.