दौंड तालुक्यातील खोर येथे कारवाई.
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील खोर येथे ओढ्यालगतच्या शेतजमिनीत खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसावर यवत पोलीस आणि महसुल विभागाच्या पथकाने छापा टाकून संयुक्त कारवाई केली. या कारवाईत शेतजमीन मालकांसह चार वाळू माफियांवर गुन्हा दाखल करीत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. मोहन गेमु राठोड (वय 32 सध्या रा. खोर ता.दौंड जि.पुणे, मुळ रा.तिरतांडा ता.गुलबर्गा जि.आळंद), सुधिर चंद्रकांत चौधरी (वय 40 खोर ता.दौंड जि.पुणे ), रूपेश दिलीप चौधरी (रा. खोर ता.दौंड जि.पुणे ), शेतजमीन मालक मारूती केशव चौधरी (रा. खोर ता.दौंड जि.पुणे ) या चार वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले आहेत.
रविवारी यवत पोलीस आणि महसुल विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना खोर येथील ओढ्यालगत असलेल्या शेत जमिन ( गट क्रमांक 318) मध्ये जेसीबी यंत्राच्या सह्याने वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार निरीक्षक पाटील, खोरचे तलाठी बापु देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, पोलीस नाईक शिंदे ,बनसोडे, पोलीस शिपाई खबाले, काळे यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी शेतजमिनीतून जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खन्न सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या पथकाने टॅक्टर टॅाली, जेसीबी मशीन, वाळू साठा असा तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तलाठी बापु देवकर यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने चार जणांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि गौण खनिज कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.