बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन भरवल्या गेलेल्या जागतिक इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातून हनुमंत चांदगुडे, पृथ्वीराज तौर, हेमंत दिवटे, नामदेव कोळी, स्वाती दीपक दामोदरे यांना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली भारतीय कवींच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या कविसंमेलनात जगभरातील 140 कवींनी भाग घेतला ज्यामध्ये विविध भाषांमधील कवी सहभागी झाले होते.
या कविसंमेलनात कवितांचे सादरीकरण व वैशिष्ट्यांचे विश्लेषण करण्यात आले. 4 जुलै ते 13 जुलै या दरम्यान हे आंतरराष्ट्रीय कवी संमेलन पार पडले. यामध्ये बारामती तालुक्यातील सुपे येथील रानकवी हनुमंत चांदगुडे यांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या या सन्मानामुळे महाराष्ट्रातील मराठी कवींचा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा वाटा असल्याचे शिक्कामोर्तब झाले. या कविसंमेलनात व्हिएतनाम, अमेरिका, चीन, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, जर्मनी, हंगेरी, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, इराण, स्पेन, अर्जेंटीना, ऑस्ट्रिया, रशिया, सिरिया, फ्रान्स, चिली, अझरबैजान, सौदी अरेबिया या देशातील कवींनी सहभाग घेतला होता.