शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
औरंगाबाद: 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याला चोरट्यांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याने 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ती रुग्णालयात मृत्यशी दोन हात करत असल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खांबाला फाटा वस्तीवर घडली आहे.
राजेंद्र जिजाराम गोरसे वय (25 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, मोहिनी राजेंद्र गोरसे वय (24 वर्षे) असं मृत्यूशी झुंज देत असलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुरुवारी रात्री जेवणानंतर सर्वजण झोपायला गेले. पतीपत्नी वेगळ्या खोलीत झोपली होते. पहाटे 3 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी मृत व्यक्तीच्या आई वडिलांच्या खोलीची बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर सदर पती पत्नीच्या खोलीचा कडीचा कोयंडा तोडून आत जाताच या दोघांना झोपेतून जाग आली.
चोरट्यांनी आत जाताच लाकडी दांडक्याने या नवदाम्पत्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात राजेंद्र रक्तबंबाळ झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आणि पत्नी मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात पडली. मात्र आई-वडिलांच्या आरडाओरडीने गावकरी धावत त्यांच्या घराकडे येत होते. ते पाहून आरोपींनी धूम ठोकली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, चोरट्यांनी चोरीसाठीच हा हल्ला केला होता का? हे अद्यापही समजले नसून, जखमी मोहिनीची प्रकृती गंभीर असल्याने वैजापूर रुग्णालयातून औरंगाबाद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहे.