माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांचा इशारा
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
उद्योजक रोहित जिंदाल यांनी पैशांचा व त्यांच्या वरिष्ठांकडे असलेल्या दबावाचा वापर करून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे व त्यांच्या सहका-यांविरुध्द दरोडा टाकल्याची खोटी फिर्याद दिली. दीपक काटे व त्यांच्या सहका-यांविरुध्द फिर्याद देणा-या उद्योजक रोहित जिंदाल व अशोक जिंदाल यांची नार्को टेस्ट करावी. बी समरी विथ प्रोसेक्युशननूसार कारवाई करावी. काटे व त्यांच्या सहका-यांची गुन्ह्यातून मुक्तता करावी, अशी मागणी एलसीबीचे पुणे पुणे शाखेचे माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी निवेदनाद्वारे पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे केल्या आहेत.
आपल्या मागण्या मान्य न झाल्यास शिवाबसव भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य, गँगवॉर मुक्त पुणे, भयमुक्त पुणे, भयमुक्त महाराष्ट्र, ओला उबेर संघटना महाराष्ट्र राज्य व वाळू वाहतूक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १२ जुलै रोजी पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माऊली चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सविस्तर हकीकत अशी की, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे व त्यांच्या सहका-यांनी दि.२६ जून रोजी लोणी देवकर एमआयडीसी मधील उद्योजक अशोक जिंदाल यांना मारहाण करून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. यानंतर जिंदाल यांचा मुलगा रोहित जिंदाल याने दीपक काटे व त्यांच्या सहका-यांविरुध्द वडीलांकडील रोकड व ऐवज जबरदस्तीने लुटून नेल्याची तक्रार दिली होती. त्यावरुन इंदापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या अनुषंगाने एलसीबीचे पुणे शाखेचे माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी आक्षेप घेतले आहेत. घटना घडून गेल्याच्या चोवीस तासानंतर ही फिर्याद नोंदवली गेली आहे. दीपक काटे व इतरांवर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राईट विथ कोरोनाची कलमे लावली गेली आहेत. दरम्यानच्या काळात अशोक जिंदाल दोन ते तीन तास इंदापूर पोलीस ठाण्यात होते. त्यावेळी त्यांनी चोरीची अथवा दरोडा टाकल्याची तक्रार केली नाही. आरोपींना जामीन झाल्यानंतर रोहित जिंदाल यांनी पैशांचा, त्यांच्या वरिष्ठाकडे असलेल्या दबावाचा वापर करून दरोडा टाकल्याची खोटी फिर्याद दिल्याचे प्रथमदर्शनी आपल्या लक्षात आले आहे असे आंधळकरांचे म्हणणे आहे.
दरोड्यासारखा गुन्हा लाइव्ह करून कोणी ही अशी लूटमार करत नाही. जो प्रकार घडला तो छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अवमान केल्याप्रकरणी घडला आहे. त्यास दुसरे वळण देण्याचे काम जिंदाल पितापूत्र करत आहेत असा दावा आंधळकर यांनी केला आहे.
गुन्हयाची खोटी फिर्याद दिली म्हणून संबंधितावर बी समरी करावी. खोटा गुन्हा आहे हे माहीत असतानासुद्धा खोटी फिर्याद दिली म्हणून बी समरी विथ प्रोसेक्युशन अशा प्रकारे कारवाई करावी. जिंदाल पितापुत्रांची नार्को टेस्ट करावी. काटे व त्यांच्या सहका-यांना गुन्ह्यातून मुक्त करावे. अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा आंधळकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.