दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कानगाव हद्दीत एकाच आठवड्यात दोन वेळा पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री हॉटेलमधून केली जात असल्याने कारवाई केली आहे. काल येथील हॉटेल विसावा मध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पाटस पोलिसांनी छापा टाकला, या कारवाईत पोलिसांनी चार जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ही माहिती पाटस पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे कानगाव येथे एका आठवड्यात बेकायदा दारूविक्रीवर ही दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे. काल झालेल्या कारवाईत महादेव हरिदास बालगीर ( वय 22 रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे ), गणेश परशुराम कोऱ्हाळे ( वय 35 रा. कानगाव ता. दौंड जि. पुणे), रवी राजू शेलार ( वय 27 रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे), रामदास आप्पासाहेब फडके ( वय 32 रा.कानगाव ता.दौंड जि. पुणे) यांना अटक करण्यात आली.
शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. कानगाव – मांडवगण फराटा रोडवरील कानगाव हद्दीत हॉटेल विसावा येथे बेकायदा दारू विक्री चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे फौजदार संजय नागरगोजे यांनी फौजदार घनश्याम चव्हाण बाळासाहेब पानसरे, पोलीस हवालदार प्रदिप काळे, पोलीस नाईक सुधीर काळे, एस आर देवकाते, विजय भापकर, समीर भालेराव आदींचे पथक कारवाई साठी तैनात केले.
या पथकाने हॉटेल विसावा येथे छापा टाकला असता चार व्यक्ती बेकायदा दारूच्या बाटल्या टेबल-खुर्च्या वरील लोकांना विकत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस आल्याचे चाहूल लागताच टेबल खुर्ची वरील अज्ञात तीन चार व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेऊन हॉटेलच्या मागील उसाच्या शेतातून पसार होण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, टेबल-खुर्च्या असा एकूण 5 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पाटस पोलिस चौकीचे पोलीस नाईक एस. आर. देवकाते यांनी फिर्यादी दिल्याने चार जणांवर बेकायदा दारू विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदिप काळे हे करीत आहेत.