दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील ३५०० लोकवस्तीचे घाटाच्या पायथ्याशी वसलेले शिरगाव या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहा दिवसांत दोन महिन्याच्या बाळासह ४२ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाले व गावात ८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याची गंभीर दखल वाईचे तहसीलदार रणजीत भोसले व गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांनी घेऊन तातडीने शिरगाव गावाला भेट देऊन पाहणी केली व विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या ३६ रुग्णांची माहिती घेऊन त्याचा सविस्तर अहवाल वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर यांना दिला. प्रांताधिकाऱ्यांनी शिरगाव संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.
शिरगावमध्ये शासनाचे आरोग्य उपकेंद्र असून देखील दुर्दैवाने या केंद्रातील यंत्रणा अपुरी पडल्यामुळे जानेवारी महिन्यापासून एकूण कोरोनाबाधित रुग्ण १८४, सध्याचे पॉझिटीव्ह रुग्ण ४२, हाय रिस्क तपासणी रुग्ण २६५, लो रिस्क तपासणी रुग्ण ११० तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव येथे ग्रामपंचायत मार्फत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये ३६ रुग्ण दखल झाले आहेत.
त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात २, गीतांजली हॉस्पिटल १, पतंगे रुग्णालय १, जम्बो सातारा १, मँप्रो रुग्णालय १ असे एकूण ४२ रुग्ण या गावात सापडल्याने व आजअखेर गावातील ८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भेट देऊन पाहणी केली. वाई वाठार रस्त्यावरील वस्तीमध्ये २० बाधित रुग्ण, बसस्थानकावर ६ बाधित रुग्ण व गावात १२ ते १३ बाधित रुग्ण सापडल्याची माहिती या दोन्ही अधिका-यांनी घेतली.
गावातील किराणा, कापड दुकान, पीठ गिरणी, हॉटेल, चिकन सेंटर, सलून, डंका, दुध डेअरी, व्यावसायिक, वाहनचालक व शेतमजूर या सर्वांनी गाव सोडून जाऊ नये यासाठी लॉकडाऊनचे आदेश तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिले.
आज गावामध्ये गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांच्या समवेत प.स. सदस्य मधुकर भोसले, सरपंच उज्वला भोसले, उपसरपंच दीपक शिंदे, आपत्ती व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गावकामगार तलाठी घम्ब्रे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, रघुनाथ भोसले, अमोल जेधे, नीलम भोसले, मंगल भोसले, दैवता भोसले, माजी सरपंच दीपक तोडरमल, नितीन भोसले, डॉ. सचिन राठोड, पोलीस पाटील उज्वला भोसले, ग्रामसेवक एस. आर. राऊत यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आजपासून हे गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले.
गावातील सर्व व्यवहार व व्यवसाय ११ जुलैपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन समिती शिरगाव व ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले. लॉकडाऊन काळात घरातून विनामास्क बाहेर पडल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाई व नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.