मुंबई : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईनंतर आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी मत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर होणार असेल, तर देशातील लोकशाही धोक्यात आली आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार जरंडेश्वर कारखान्याची विक्री झाली होती. या उलट राज्य सहकारी बँकेमध्ये नफा झाला होता. संचालक मंडळाने साखर कारखाना विकलेला नाही. जरंडेश्वर साठी 12 ते 15 कंपनीचे टेंडर होते, मागील सरकारमध्ये देखील सीबीआय व सीआयडी चौकशी यासंदर्भात झालेली होती, त्यावेळी काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यावेळी देखील भाजपचे सरकार होते. त्यामुळे आता हे जे सुरू आहे ते हे ओळखण्यासाठी काय जनता दुधखुळी नाही असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान माजी खासदार व स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ईडीचा हा गैरवापर असल्याची टीका केली असून, फक्त एकाच कारखान्यावर कारवाई करून राज्याची सत्ता मिळवायची असेल तर हे आपल्याला मान्य नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये 47 साखर कारखाने अशा पद्धतीने विकले गेले, ते सर्व पक्षाच्या नेत्यांनी विकत घेतले. त्यामुळे करायची असेल तर सर्व कारखान्यांची चौकशी करावी या मागणीवर मी पूर्वीपासून ठाम आहे. मात्र आता जे सुरू आहे ते केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे असे राजू शेट्टी म्हणाले.
दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी देखील घणाघाती टीका केली. ईडी आणि सीबीआयचा वापर हे पाठीत वार करणारे शास्त्र आहे. सरकार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असेल, तर असल्या ईडी आणि सीबीआयच काय, तर शंभर रणगाडे आणले तरी सरकार पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे, राज्यातील सर्व विकलेल्या साखर कारखान्याची चौकशी केली, तर खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर निघेल असा आरोप त्यांनी केला. त्याच वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र केंद्र सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकार पाडण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीचा आधार घेत असल्याची टीका केली.