दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील खडकी येथील लॅाजवर दौंड पोलीसांनी छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत याठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलीसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केले आहे. अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
सुकेशनी बाबाराव तोतडे (रा. कवडस,नागपूर ), प्रकाश शंकरलाल चैरसिया (रा. देवास,मध्य प्रदेश), सुनील व्यंकटराव जांभगे पाटील (रा. बसवकल्याण, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद), संतोष जयाशील शेट्टी (रा. हसुर, कर्नाटक, सध्या सुर्या लॉज खडकी) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभुमीतही दौंड तालुक्यातील हॅाटेल आणि लॅाजवर खुलेआमपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे यामुळे उघड झाले आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील खडकी येथील सूर्या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कारवाईसाठी पथक तैनात केले.
या पथकाने गुरूवारी (दि.1) सायंकाळी सुर्य़ा लॅाजवर बोगस ग्राहक पाठवले असता याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शानास आले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून हा वेश्या व्यवसाय चालवीत होते. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एच.एस.होले यांनी फिर्याद दिल्याने चार आरोपींवर स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पोलीसांनी लॉजवर मिळून आलेल्या मुलीस सुधारगृहात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.