ठेकेदारावर कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत पाटस (ता.दौंड ) हद्दीत एका खासगी गॅस कंपनीकडून सीएनजी ( वायुरूप इंधन ) या गॅससाठी धोकादायक पद्धतीने खोदाईचे काम सुरू आहे. हे काम एका माजी आमदारांच्या चिरंजीवाच्या आशिर्वादाने सुरू आहे. काम नियमांचे उल्लघंन करीत सुरू असताना या चिरंजीवांच्या राजकीय दबावामुळे राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन संबंधित ठेकेदारावर ठोस कारवाई करण्यास टाळटाळ करीत असल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत यवत ते कुरकुंभपर्यंत सीएनजी गॅसची भुमीगत पाईप लाईनचे काम जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने सुरू आहे. हे काम करताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत मनमानी पध्दतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे.
हे काम करताना संबंधित कंपनीच्या ठेकेदाराकडून सेवारस्ता; तसेच ज्या ठिकाणी सेवारस्ता नाही, त्याठिकाणी अगदी रस्त्यापासून दहा मीटरच्या आताच खोदाई काम करण्यात आले आहे. तसेच गॅसपाईप लाईन या महामार्गालगत धोकादायक पध्दतीने ठेवल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून ये-जा करणा-या वाहनांना आणि स्थानिक नागरीकांना अडथळा ठरत असून छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.
वरवंड आणि पाटस येथे काही ग्रामस्थांनी हे काम अडविले होते. मात्र एका माजी आमदार पुत्राने मध्यस्थी करत काम चांगले आहे, हे काम सुरू करा, अडथळा आणू नका असे सांगत ठेकेदाराची पाठराखण केली. काही दिवासांपुर्वी पाटस येथील भागवतवाडी येथे दुचाकीस्वाराचा अपघात होऊन एका नागरीकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती.
या गॅस पाईप महामार्गालगत असल्यानेच हा अपघात झाला असून ठेकेदार मृत्युस कारणीभुत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला होता. तशी तक्रार ही पोलीस प्रशासनाकडे केली होती. तेथेही संबंधित माजी आमदार पुत्राने हस्तक्षेप केल्याने संबंधित ठेकेदावर कारवाई केली गेली नसल्याची परिसरात चर्चा आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही ठेकेदारावर कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
संबंधित ठेकेदाराने हे काम करताना स्थानिक नागरीक व महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक यांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने कसलीच उपाययोजना केली नाही. हलगर्जीपणा आणि बेजाबदारपणे हे काम सुरू असतानाही राजकारणी या ठेकदाराची पाठराखण का करीत आहेत? या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दौंड तालुक्याच्या राजकारणात नुकताच चंबु प्रवेश करणा-या माजी आमदाराच्या या चिरंजीवांचे चुकीच्या पध्दतीने काम करणा-या ठेकेदाराचे समर्थन करणे, कारवाई होवू नये यासाठी राजकीय दबावाचा वापर करणे हा एक तालुक्यात चर्चाचा विषय बनला आहे. हे गॅस काम या माजी आमदारांच्या चिरंजीवांनीच तर घेतले नाही ना ? अशी ही चर्चा सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने नियमांप्रमाणे आणि महामार्गावर प्रवास करणा-या वाहनांना अडथळा आणि स्थानिक नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत जबाबदारीने काम करावे अशी नागरीकांची अपेक्षा आहे.