सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कन्या समृद्धी योजना राबवली जात असून त्या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील बोरी आणि बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या गावाची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत बोरी येथे आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी कुटुंबीयांना 400 रोपांचे वितरण करण्यात आले.
कन्या वन समृद्धी योजना काय आहे ?
ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दांपत्याला १० रोपे विनामूल्य देवून प्रोत्साहित केले जाणार आहे. या कुटुंबांना पर्यावरण वृक्षलागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता आदीबाबत सध्याच्या व भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण केली जाणार आहे.
अशा योजनेतून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश दिला जाणार असून मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचाही उद्देश यामागे आहे.
दरम्यान या संदर्भात बोरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक वनीकरण इंदापूर शाखेचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, बारामतीचे वन परिमंडळ अधिकारी गणेश सरोदे, इंदापूरच्या सामाजिक वनीकरणाचे वन परिमंडळ अधिकारी अर्चना कवितके यांच्या उपस्थितीत सन २०२०- २०२१ या वर्षात जन्मलेल्या सर्व मुलींच्या पालकांना आंबा, जांभूळ, चिंच, कडूनिंब व बांबू अशा एकूण ४०० रोपांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत बोरी व विविध संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व वृक्षप्रेमी तरुण व बोरी विकास मंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.