राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणजेच पाटस ते बारामती पर्यंत पालखीच्या राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. संत तुकाराम महाराज पालखीमार्गावर असलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेला रोटीचा नागमोडी वळणाच्या घाटात हे काम सुरू आहे. या घाटात नागमोडी वळण राहणार नसून सरळमार्ग रस्ता होणार आहे. यामुळे पुढील वर्षी पालखी या घाटातील नागमोडी वळणे राहणार नाहीत. हा घाट आता इतिहासजमा होणार आहे.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या या रस्त्यासाठी 500 कोटी रूपयांचा भरीव निधी उपलब्ध झालाला आहे. याला भारतीय राजमार्ग अर्थात राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.आय ) चा दर्जा मिळाला आहे.
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी मार्गाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या देखरेखीखाली पाटस ते बारामती पर्यंत सध्या सुरू आहे. सध्या पाटस हद्दतीतून पालखी मार्गाच्या रस्त्यांच्या सुरू झाले आहे.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा दरवर्षी वरवंड येथील मुकाम आटोपून पाटस येथे विश्रांती घेतो. तेथून पाटसपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रोटीच्या नागमोडी वळणाच्या घाटातून नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार डोंगरातून भक्तीमय वातावरणाने संत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत पंढपुरकडे मार्गस्थ होत असते.
रोटी घाटात पालखी आल्यावर या पालखीला दहा ते बारा बैलजोडी लावून रोटीचा घाटाचा हा टप्पा पार करावा लागतो. रोटीघाटातील हा पालखी सोहळा पाहण्यासाठी दौंडसह शिरूर, श्रीगोंदा इंदापुर या तालुक्यातील भक्त येत असतात. आपल्या कॅमेरात हे दृश्य टिपण्यासाठी सर्व मिडीया या घाटात पालखी सोहळ्याच्या आगमानाची वाट पहात असतात.
मात्र आता या रोटीच्या या नागमोडी घाटात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुर्वीसारखा पहावयास मिळणार नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात नागमोडी वळण कमी करण्यात येणार असून सरळ मार्ग रस्ता काढण्यात येणार आहे. कदाचित पुढील वर्षी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला रोटी घाटातील नागमोडी वळण संपुष्टात येईल. यापुढील काळात या पालखी मार्गावरील रोटीचा नागोमोडी वळणाचा हा घाट आता इतिहास जमा होणार आहे.