इंदापूर : महान्युज लाईव्ह
तुझे आई वडील हे असाध्य आजाराने पॉझिटिव्ह आहेत.. त्यांच्यामुळे आम्हाला रोग होईल.. असा आरोप करत युवकास तुम्ही येथे राहायचे नाही, असे म्हणत त्या युवकाच्या आई व बहीण यांना एका दांपत्याने हाताने लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली.
त्यावेळी युवक हा भांडणे सोडविण्याकरिता गेला असता त्याच्या दोन्ही पायाच्या मांडीवर तसेच पाठीवर पाण्याच्या रबरी पाईपने मारहाण केल्याची घटना लाखेवाडी गावच्या हद्दीत घडली. ही घटना 30 जून रोजी दुपारी एक वाजता घडली
सदर युवकाने मारहाण करणाऱ्या रघुनाथ तुकाराम गायकवाड व सारिका रघुनाथ गायकवाड (रा. लाखेवाडी या. इंदापूर) त्यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी युवक हा शिक्षण घेत आहे. दरम्यान फिर्यादी युवकाची बहीण हिच्या गळ्यातील 23 हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाची सोन्याची चैन रघुनाथ गायकवाड याने हिसकावून घेतली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीनुसार इंदापूर पोलिसांनी भा. द. वि. कलम 324, 323, 327, 504, 506, 34, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलाम 30, 33, 34, 41, 51 व भारतीय साथ रोग कायदा 1897 चे कलम 3, 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस शिपाई नगरे हे करत आहेत.