खंडाळा : महान्यूज लाईव्ह
1 जुलै हा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. हा दिवस महाराष्ट्र कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शेतकर्यांचा सन्मान व्हावा म्हणून ‘स्पंदन कवी मनांचं’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्याचीवाडीच्या शिवारात संपन्न झाले.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने हा आगळावेगळा सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी शेतकरी सविता कुसळे, सुरेखा माने, सुशीला माने, अश्विनी माने, स्वाती माने, संगिता कुसळे, तानाजी कुसळे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, पत्रकार पोपट माने, पत्रकार प्रदीप माने व अन्य मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
विविध कवींनी शेती, शेतकरी यासंबंधी केलेल्या अप्रतिम कविता यात आहेत. प्रा.जयंत कदम, कोहिनूर कवी विलास काळे, सत्यवान मंडलिक, शिवाजी मस्कर, पत्रकार दादासाहेब पवार, प्रा.बबन साबळे, दिपाली साळवी, तुळशीराम सुतार, प्रा.सुरेश यादव, चंद्रकांत कांबिरे, प्रदीप पाटील या कविंच्या सुंदर कवितांनी काव्यसंग्रह बहरला आहे.
स्पंदन प्रकाशनने प्रकाशित केलेले हे तिसरे पुस्तक आहे. शेतकरी राजाराम डाकवे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाचे संपादन डाॅ. संदीप डाकवे व प्रा. ए. बी. कणसे यांनी केले असून कलाशिक्षक बाळासाहेब कचरे यांनी कॅलिग्राफी केली आहे. या अनोख्या पुस्तक प्रकाशनाने शेतामध्ये भांगलणी करणार्या महिला भारावून गेल्या. काही क्षण त्यांनी आपले कष्ट विसरले.
चैकटीत :
शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान व्हावा. शेती, शेतकरी यांचे कष्ट, भावना, आनंद साहित्यातून लोकांसमोर यावे. शेतकर्यांचा आत्मसन्मान वाढावा यासाठी या ‘स्पंदन कवि मनांचं’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे मत स्पंदन ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.