पुणे : महान्यूज लाईव्ह
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आज जरंडेश्वर साखर कारखान्याची जबाबदारी असलेले राजेंद्र घाडगे यांच्याकडे वक्रदृष्टी फिरवली आहे. ही वक्रदृष्टी फिरवण्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली.
माजी मंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ईडीने आज संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे सापडलेले पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाणार होते असा दावा केला आहे.
त्यापाठोपाठ कालच भाजपने अजित पवार व अनिल परब यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले असून, सन 2019 मध्ये ज्या विषयावरून वादळ उठले आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ईडीला नमवले, तेच शस्त्र पुन्हा एकदा ईडीने उगारले आहे. यामागे भाजपचा डाव असल्याची चर्चा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करू लागले आहेत.
राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव अल्पदरात करण्याचा आणि ते नातेवाईकांनाच विकल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर करण्याच्या तयारीत ईडी आहे. यामध्ये अप्रत्यक्षरित्या अजित पवारांचा संबंध असल्याचा दावा ईडी करू शकते असे सांगितले जाते.
महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई करण्यास सुरुवात केली असून, जरंडेश्वर साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईमुळे ईडीच्या रडारवर अजित पवार असल्याची चर्चा भाजप नेते करीत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप झालेल्या राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट (चौकशी बंद करण्याचा अहवाल) सादर केला होता. आता ईडीने याला विरोध दर्शवत चौकशी सुरू केली आहे.
याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची परवानगी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने विशेष न्यायालयाकडे मागितली होती. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मध्येच अजित पवार हे भाजपसोबत सत्ताही स्थापन करण्यासाठी पुढे आले. भाजपसह सत्ताही स्थापन झाली. त्यानंतर हे प्रकरण थांबले असतानाच आता पुन्हा ईडीने हे प्रकरण हाताशी धरले आहे. आता अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.