दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : कवठे (ता. वाई) येथील कोविड सेंटरमध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने एकत्रित येऊन कोरोना महामारीच्या काळात शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कवठे कोविड सेंटरचे नाव जिल्ह्यामध्ये उंच शिखरावर नेले.
याच आनंदाचा आधार घेत आज राज्यभर साजरा होत असलेल्या डॉक्टर्स डे चे औचित्य साधून येथील डॉ. विजय ठोंबरे, डॉ. गणेश पार्टे, डॉ. हर्ष नायकवडी, डॉ. विदुला पोळ या सर्व कोरोना योद्ध्यांना सोबत घेऊन केक कापून व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर डे सर्वांनी आनंदाने साजरा केला.
४० गावातील बाह्य रुग्णांना आणि महामार्गावरील होणा-या सततच्या अपघातग्रस्तांना उपचार करीत कोरोना केंद्राचा उज्वल आलेख वाढविण्यात येथील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी कधीही कमी पडले नाहीत. असे उद्गार या प्रसंगी कवठे ग्रामस्थांनी व्यक्त केले.
वाई तालुक्यातील असलेल्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक १८ जुलै २०२० रोजी कोरोना केअर सेंटर उभा करण्यात आले होते. वाई तालुक्यातील गावागावांमध्ये मार्च २०२० पासून कोरोना रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली होती. हा रोग नवीनच असल्याने डॉक्टरांना देखील याचा उपचार करण्यासाठी अंदाज नसल्याने एका बाजूला रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आणि रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत असताना अचानकपणे मृत्यूचे प्रमाण वाढत होते.
यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह, आमदार मकरंद पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप यादव या सर्वांनी एकत्रित बसून कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.
येथील डॉ. विजय ठोंबरे, डॉ. गणेश पार्टे, डॉ. हर्ष नायकवडी, डॉ. विदुला पोळ व अधिकारी व कर्मचारी वर्ग जिद्द व चिकाटीचा असल्याने या ठिकाणी ३० ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली. तालुक्यातील पॉझिटिव्ह येणारे सर्व रुग्ण दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले.
येथे दाखल होत असलेले रुग्ण अल्पावधीत येथील डॉक्टर टीमने बरे करण्याचा मनापासून सुरु केलेला सपाटा हा प्रशासनाला आश्चर्यकारक धक्का देवून जात होता. येथे रुग्णांना धीर देण्याची आणि डॉक्टर व कर्मचारी यांच्यातील शिस्त व जिद्द हि दाखल होत असलेल्या रुग्णांना शाश्वत पहावयास मिळत असल्याने रुग्णांचे खचलेले मनोधैर्य वाढीस लागल्याने मी जगणार अशी भावना तयार झाल्याने आजअखेर येथून ५५० कोरोना रुग्ण बरे होऊन समाधानाने घरी पोहोचले आहेत तर २० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
येथील डॉ. विजय ठोंबरे यांनी रुग्ण वाचविण्यासाठी केलेली धडपड शासन दरबारी उत्कृष्ठ डॉक्टर म्हणून नोंद झाली आहे. अशा या कोरोना सेंटरमध्ये आज डॉक्टर डे केक कापून साजरा करण्यात आला.