संदीप मापारी पाटील, बुलढाणा
वाशीम – रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील शेतकरी परिवारातील जी. ए. सानप यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. एका शेतकरीपुत्राने मारलेली ही मजल गावासाठी अभिमानाची बाब बनली आहे.
सानप यांचा जन्म भर जहागीर येथील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. वडील आनंदराव विठोबा सानप हे शेतकरी होते. ग्रामीण भागात शिक्षण पहली ते दहावी गावीच झाले. बारावी रिसोड येथे, त्यानंतर वाशिम येथे पदवीचे शिक्षण घेतले. तर कायद्याची पदवी अकोला येथे घेतली. येथे ते गुणवत्ता यादीत झळकले होते.
सन 1990 ते 93 मध्ये वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात वकीलीची प्रॅक्टिस केली. 93 ते 96 मध्ये मालेगाव येथे प्रॅक्टिस केली. 1996 त्यांची न्यायाधीश लघुवाद न्यायालय मुंबई येथे प्रथम नियुक्ती झाली. 2008 मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश पदी पदोन्नती झाली. 2010 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक म्हणून त्यांची बदली झाली. 2011 मध्ये शहर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई येथे त्यांची बदली झाली.
तेथे त्यांची टाडा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली त्यांनी 2011 ते 2017 पर्यंत 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट खटला चालविला तसेच या काळात त्यांनी टाडा कायद्याअंतर्गत इतरही महत्त्वाचे खटले चालविले. सन 2017 मध्ये त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल दिला. त्यांनी 26/11 रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे खटल्याचे कामकाज चालविले.
त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने डेव्हिड हेडली या अमेरिकी नागरिकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष नोंदविली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची जळगाव येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदी नेमणूक झाली. तेथे त्यांनी दोन वर्ष काम केले.
मागील एक वर्षापासून ते महाराष्ट्र सहकार अपील न्यायालय याचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. 25 जून 2021 रोजी न्यायाधीश श्री जी. ए. सानप यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीने रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील नागरिकांकडून अभिनंदन व अभिमान व्यक्त केला जात आहे.