पुणे : महान्यूज लाईव्ह
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनाचे कारण सांगून ईडीच्या कार्यालय चौकशीला नकार दिल्यानंतर ईडीने त्यांच्या घरी येऊन चौकशी करण्याचा इशारा दिला. त्यानंतर 40 कोटींची मालमत्ता जप्त केलेल्या उद्योजक अविनाश भोसले यांना देखील ईडीने समन्स बजावले होते, मात्र भोसले यांनीदेखील कोरोना चे कारण सांगितले, त्यावर ईडीने पुण्यातील कार्यालयात चौकशी सुरू केली आहे.
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांना निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारत बांधण्याच्या प्रकरणात चौकशी ला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे त्यांना आदेश दिले होते, परंतु अविनाश भोसले यांनी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाला कोरोनाचे कारण सांगून टाळले.
त्यावर ईडीने पुण्यातील कार्यालयात चौकशी सुरू केली आणि उद्या म्हणजे दोन जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान भोसले यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने चौकशीला सामोरे जाण्याचा आदेश दिल्याने भोसले यांची मोठी पंचाईत झाली आहे.