राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणजेच पाटस ते बारामतीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. सध्या हे काम पाटस हद्दीत सर्वेक्षण करण्यात आलेल्या आणि हस्तांतरीत केलेल्या शेतजमिनीतून सुरू करण्याचे काम जलद गतीने सुरू केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम वेगाने सुरू केल्याने वारकरी साप्रंदायाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
या पालखी मार्गात दौंड तालुक्यातील 1222, बारामतीतील 3459 व इंदापूरमधील 3044 असे 7725 शेतकरी बाधित होत आहेत, मात्र पाटस ते सराटीपर्यंत चार पदरी महामार्गाची निर्मिती होताना या प्रकल्पासाठी 39 गावातील 187 हेक्टर जमीन संपादीत करायची असून एकूण 9000 शेतकरी बाधित होतील व त्यांना जवळपास 1160 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. 550 कोटींचा निधी महसूल विभागाकडे जमा असून त्यातील 227 कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे.
मागील अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम अखेर प्रत्यक्षात सुरू झाले आहे. राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या पयत्नातून केंद्रीय महामार्ग मंत्रायलाय जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या या रस्त्यासाठी 500 कोटी रूपयांचा भरीव निधी उपल्बध केला आहे. यास भारतीय राजमार्ग अर्थात राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.आय ) चा दर्जा मिळाला आहे.
काही वर्षापुर्वी या महामार्गासाठी पाटस ते बारामती पर्यंत या महामार्गाच्या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण आता पुर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरण आता कोणत्या ठिकाणावरून होणार आहे हे जवळ जवळ निश्चित करण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी मार्गाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या देखरेखेखाली पाटस ते बारामती पर्यंतच्या कामास सुरवात करण्यात आले आहे. सध्या पाटस हद्दतीतून या मार्गाच्या रूंदीकरणाचे जलद गतीने सुरू झाले आहे. दौंड तालुक्यातून पाटस ते वासुंदे (गुंजखिळा ) पर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.
दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या महामार्गाच्या रूंदीकरणात जाणार आहेत. संत तुकाराम महाराज यांची पालखी पाटस ते बारामती या राज्यमार्गावरून पंढपुरकडे मार्गस्थ होत असते. या पालखी मार्गाची दौंडच्या हद्दीत म्हणजे पाटस ते वासुंदे (गुंजखिळा ) पर्यंत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुरावस्था झाल्याने या पालखी सोहळ्यापुर्वी तात्पुरती डागडूजी करून खड्डे बुजविण्यात येत होते. अनेक अडथळे आणि नाहक त्रास या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांना होत होता.
मात्र आता या पालखी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा प्राप्त झाला असून नव्याने सुसज्ज असा रस्ता होणार आहे. पालखी सोहळ्याला शोभेल असा रस्ता आणि नैसर्गिक सौंदयात भर पडण्यासाठी महामार्गालगत झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात हा महामार्ग सुंदर आणि आकर्षित होईल अशी अपेक्षा असून त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या कामात लक्ष घातले आहे.
वनविभागाच्या वनक्षेत्रात रूंदीकरणाच्या कामात अडथळा..
दौंड तालुक्यात रोटी, हिंगणीगाडा आणि वासुंदे या भागात वनविभागाच्या हद्दीतून हा राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरणाचे काम जाणार आहे. मात्र वनविभागाने त्यांच्या हद्दीतून जात असलेले काम थांबविले आहे. संबंधित विभागाने वनविभागाकाडे सातत्याने याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप तरी वनविभागाने परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारने पालखी सोहळा रद्द करीत संत तुकाराम महाराज यांची पालखी सजावट केलेल्या बसमधून पंढपुरला याच मार्गावरून नेण्यात आली होती. पुढील महिन्यात पालखी सोहळ्याची तयारी सरकारने आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विश्वस्तांनी केली आहे.
यंदा पाटस ते बारामती राज्यमार्गावरून ही पालखी सोहळा मार्गस्थ होणार असून कदाचित पुढील वर्षी नवीन राष्ट्रीय महामार्गावरून संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा जाईल अशी अपेक्षा असून त्याच दुष्टीने या महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे