सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील गांधी कृषी भांडार या दुकानावर कृषी विभागाने छापा टाकला. त्यामध्ये संबंधित दुकान २१ दिवसांसाठी सील बंद करण्याची कारवाई केली. दरम्यान या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊ रुपनवर यांनी दिली.
निमगाव केतकी येथील गजकुमार हिराचंद गांधी कृषी भंडार हे दुकान दुकानांमध्ये खत शिल्लक असतानाही तुटवडा असल्याचे सांगून शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करत होते. यासंदर्भात इंदापूर तालुक्यातील काटी येथील प्रवीण एकनाथराव बारवकर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे व तहसीलदारांकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीवरून कृषी विभागाने या ठिकाणी छापा टाकला तेव्हा दुकानात 12 लाख 5 हजार रुपयांचे खत आढळून आले. यामध्ये यावेळी युरिया खताच्या तब्बल 992 पिशव्या, अमोनियम सल्फेट खताच्या 174 पिशव्या, 10: 26: 26 खताच्या 455 पिशव्या, सुपर फास्फेट च्या 380 पिशव्या, 20 :20: 0 खताच्या 980 पिशव्या होत्या. मात्र तुटवडा असल्याचे सांगून दुकानदार मात्र या दराने खत विक्री करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले होते.
दुकानदारांनो जरा लाज बाळगा! शेतकरी दुकान पेटवून देत नाहीत, हे नशीब समजा!
इंदापूर तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील खत विक्रेत्यांकडून असा प्रकार सुरू आहे. युरिया आणि तत्सम खतांचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. खताबरोबर बियाणे खरेदीचा किंवा न करणाऱ्या औषधांचा खरेदीचा आग्रह केला जातो. अर्थात यामध्ये पॉस मशीन द्वारे खत विक्री केली नसल्याने काही ठिकाणी खतांची मात्रा अधिक आढळल्याची दिसते, मात्र प्रत्यक्षात उपलब्ध नाही हे देखील वास्तव चित्र आहे. परंतु शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन खतांमध्ये दामदुप्पट पैसे गोळा करण्यासाठी खताचा तुटवडा असल्याचे सांगणे अत्यंत विकृतीचे लक्षण आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचा हा दुकानदार आसपासच्या गावातील शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये दरवर्षी मिळवतो. मात्र शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी हा शेतकरी त्याची नफेखोरीची नखे बाहेर काढतो, अशा वेळी फक्त कृषी विभागाने दुकान सीलबंद करून चालणार नाही. शेतकऱ्यांनी देखील अशा दुकानांवर पूर्ण बहिष्कार घातला पाहिजे. त्याखेरीज असे दुकानदार जागेवर येणार नाहीत. एकीकडे शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहेत आणि दुसरीकडे असे मेलेल्या मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे विकृत व्यवसायिक जन्माला येत असतील, तर ती प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे आणि ती शेतकऱ्यांच्या हातात आहे. शेतकऱ्यांनी सामूहिकपणे अशा दुकानांवर बहिष्कार घातला पाहिजे.