बारामती : महान्यूज लाईव्ह
मुंबईमध्ये बोगस लसीकरण केलेल्या आरोपीला कांदिवली पोलिसांच्या माहितीनुसार बारामती पोलिसांनी अटक केली. बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉज मधून आरोपी राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
राजेश पांडे याने मुंबईत कोविडची लस असल्याचे भासवून भेसळयुक्त द्रव्य नागरिकांना दिले होते. वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलची प्रमाणपत्रे नागरिकांना देऊन नागरिकांची फसवणूक केली होती. 30 मे 2021 या दिवशी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत प्रत्येकी बाराशे 60 रुपये घेऊन राजेश पांडे याने कोरोना ची लस लोकांना दिली होती.
ही लस 390 जणांना दिली होती. आत्तापर्यंत या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींकडून 12 लाख 40 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेंद्र प्रतापसिंग आणि मनिष त्रिपाठी यांच्यानंतर आता पोलिसांनी राजेश पांडे यालाही ताब्यात घेतले आहे.
राजेश पांडे याच्या विरोधात कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. राजेश पांडे याने एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून नोकरी असताना त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून भेसळयुक्त द्रव्य हे कोरोनाची लस असल्याचे भासवून लोकांचा कॅम्प घेऊन लसीकरण केले होते. यामध्ये सील तुटलेल्या कोविड लशीच्या बाटल्या या भेसळयुक्त द्रवाने भरून लोकांची फसवणूक केली होती.
यासंदर्भात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास अजून सुरू आहे. यादरम्यान राजेश पांडे हा फरार झाला होता, मात्र तो बारामतीत आल्याचे कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी बारामती शहर पोलिसांना कळवले. त्यावरून बारामती शहर पोलिसांचे पथक अमृता लॉज मध्ये गेले. या ठिकाणी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.