पुणे : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेत नगर विकास विभागाने आज पुणे महानगरपालिकेमध्ये 23 गावांचा समावेश केला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावांची अनुसूची एक आणि अनुसूची दोन अशा स्वरूपात समावेश केलेला आहे.
पुणे शहरामध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या या गावांमध्ये महाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकर वाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली आदी २३ गावांचा समावेश आहे.
तर अनुसूची 2 मध्ये पुणे शहराची सुधारित हद्द म्हणून उत्तरेकडे कळस, धानोरी व लोहगाव या महसुली गावांची हद्द असणार आहे. उत्तर पूर्वेस लोहगाव, वाघोली या महसुली गावांची हद्द असणार आहे. पूर्वेकडे मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, फुरसुंगी या महसुली गावांची हद्द असेल. दक्षिण पूर्व बाजूस उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसुली गावांची हद्द राहील.
दक्षिणेस धायरी वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसुली गावांची असेल. दक्षिण पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी, सनगर कोपरे या गावांची महसुली गावांची हद्द असेल. पश्चिमेस कोंढवे-धावडे, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, महाळुंगे सुस या महसुली गावांची हद्द असेल, तर पश्चिम उत्तरेकडे बाणेर, बालेवाडी या महसुली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द असेल.