महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मागील सात महिन्यांपासून शेतकरी कायद्यांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आज पुन्हा हिंसक वळण लागले. गाजीपुर बॉर्डरवर भाजपच्या एका नेत्याचे स्वागत करताना, भाजपच्या नेत्यांनी बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचा मंच ताब्यात घेतला. तेथे झेंडे फडकावले. यानंतर मात्र भाजपा कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी दगडफेक करत भाजप कार्यकर्त्यांना पिटाळून लावले.
गाजीपुर बॉर्डर नजीक भाजपचे एक पदाधिकारी येणार असल्याने भाजपचे कार्यकर्ते तिथे जमले होते. मात्र शेजारीच शेतकरी आंदोलनाचा मंच होता. कार्यकर्त्यांनी मंचाच्या ठिकाणी झेंडे लावले आणि त्यानंतर मात्र गोंधळाला सुरुवात झाली. आंदोलक शेतकऱ्यांनी याठिकाणी दगडफेक केली.
परिस्थिती एवढी बिघडली की या ठिकाणाहून भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांच्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
या प्रकरणावरून शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश क्रिकेट यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. ते म्हणाले, आंदोलनाचा मंच हा रस्त्यावर आहे हे मान्य, परंतु तो रस्त्यावर आहे म्हणून कोणीही येऊन त्यांचे झेंडे फडकावेत हे मात्र आम्हाला मान्य नाही. गाझीपुरच्या मंचावर भाजपचा झेंडा फडकवला आणि मंच ताब्यात घेतला असे भाजपने दाखवले. मात्र शेतकऱ्यांच्या संतापापुढे कोणाचे काय चालणार नाही. या पुढील काळात असा प्रकार घडला, तर राज्यात फिरणे देखील त्यांना मुश्कील होईल.