संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अस्मिता तांबे यांच्या कथित भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लोणार तालुक्यातील २५ सरपंचांनी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लोणार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अस्मिता तांबे या रुजू झाल्यापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणतेही कामे झाली नाहीत. कोरोना सारख्या महामारीच्या काळात लोकांच्या हातांना कोणतेही काम नसताना व आम्ही सर्व सरपंचांनी गटविकास अधिकारी यांना गावातील गोठे, शेतरस्ते, विहिरी व इतर कामाची मागणी केली असता त्यांनी आपल्या मर्जीतल्या ठराविक लोकांना शेतरस्ते, विहिरी मंजूर करून दिले. यात आर्थिक तडजोड झाल्याचा आम्हाला संशय असल्याचे या सरपंचांचे म्हणणे आहे.
दरम्यान सामान्य सरपंचांना आपल्या पदाचा रुबाब दाखवत त्यांनी वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली. जाब विचारायला गेल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी त्यांनी वेळोवेळी दिली. आमच्याकडून कोणत्याही कामासाठी दहा टक्के रकमेची मागणी होते.
जिल्ह्यात इतर ठिकाणी पंधराव्या वित्त आयोगाची कामे सुरू असून लोणार पंचायत समितीला फक्त 15 व्या वित्त आयोगाच्या कामांना मंजुरी दिली नाही. लोणार तालुक्यातील सरपंचांना त्यांनी मानधनापासून वंचित ठेवले आहे. रोजगार हमीच्या कामांना मंजुरी न देता गावाच्या विकासाला बाधा पोहोचणे आणि ग्रामसभेचे ठराव फळबागेसाठी दिली असताना कृती आराखडा जिल्ह्याच्या ठिकाणी न पाठवणे यामुळे गरजू शेतकऱ्यांना फळबाग योजनेपासून वंचित राहावे लागले. तालुक्यातील मौजे हत्ता येथील एकाच आठवड्यात तीन ग्रामसेवकाची नियुक्ती केली. गटविकास अधिकारी अस्मिता तांबे यांच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड ची माहिती घेऊन लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी करत लोणार तालुक्यातील सर्व सरपंचांना न्याय देण्यात यावा असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, लाचलुचपत विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यासह संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनावर रेश्मा रूपम राठोड, चंद्रकला अवचार, वर्षा शिवशंकर तेजनकर, साधना दिनकर बोडखे, लता संजय राठोड, अलका विजय सानप, कौताबाई बाबुराव ढाकणे, सुदाम देवकर, रेखा विलास दहातोंडे, अर्चना विश्वास सोनुने, नंदाबाई विश्वनाथ मुंडे, राजू परसराम चव्हाण, संजय कडूजी सानप, सिंधू विष्णू भालेराव, विकास दत्तात्रय पिसे, निजाम कालू चौधरी, अर्चना दत्तात्रय पडघान, वनिता प्रमोद जुमडे, नागेश घुगे, निर्मला जगाराव आडे, अशोक चव्हाण, मिलन विठ्ठल वायाळ, कमल मदनराव चौधर, चंदाबाई उत्तम गुलमोहर आदी सरपंचाच्या सह्या आहेत.