राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत पाटस (ता.दौंड ) हद्दीत एका खासगी गॅस कंपनीकडून सीएनजी ( वायुरूप इंधन ) या गॅसचे खोदाई करण्याचे काम सुरू आहे. ही खोदाई करताना गॅस पाईप महामार्गालगत विचित्र अवस्थेत ठेवल्या गेल्या आहेत. परिणामी हे पाईप लाईन महामार्गावर जाणार वाहनांना अडथळा ठरत असून अपघाताला निमंत्रण देत आहेत. संबंधित ठेकेदारांकडून राजकीय दबाव तंत्र वापरून मनमानी पध्दतीने काम सुरू केले आहे.
दरम्यान काही दिवसांपुर्वी भागवतवाडी येथे एका दुचाकीस्वाराचा अपघात होवून मृत्यु झाल्याची घटना घडली होती. या पाईप लाईन या अपघातास कारणीभूत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकरांनी या ठेकेदारावर आणि संबंधित गॅस कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत मागील काही दिवसांपासून यवत ते कुरकुंभ पर्यंत सीएनजी गॅसची भुमीगत पाईप लाईनचे काम सुरू आहे. सध्या पाटस हद्दीत महामार्गापासून काही ठराविक अंतरावर जेसीबी आणि पोकलाईन मशीनच्या सहाय्याने महामार्गालत खोदाई काम जोरात सुरू आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने काही ठराविक अंतर आणि नियम व अटीचे पालन करण्याचे अटीवर या कामास परवानगी दिली आहे. मात्र हे संबंधित सीएनजी ( वायुरूप इंधन ) गॅस कंपनी आणि ठेकदाराकडून हे काम करताना सर्रास पणे नियमांचे उल्लघंन करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
हे काम करताना खोदाईचे काम करताना अनेक ठिकाणी खोदाई उंची कमी जास्त आहे. तर अनेक ठिकाणी सेवारस्ता तसेच ज्या ठिकाणी सेवा रस्ता नाही त्याठिकाणी अगदी रस्त्यापासून दहा मिटरच्या आतच खोदाई काम करण्यात आले आहे. हे खोदाई काम करताना संबंधित ठेकेदारांनी गॅस पाईप लाईन या महामार्गालगत अंत्यत धोकादायक पध्दतीने टाकल्या आहेत. परिणामी हे पाईप महामार्गावर येजा करणारे वाहनांना अडथळा ठरत आहे. काही ठिकाणी दुचाकी चालकांचा अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पाटस येथील भागवतवाडी येथे मागील तीन दिवसांपुर्वी दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यु झाल्याची घटना घडली होती.
या गॅसपाईप मुळेच हा अपघात झाला असून मृत्युस कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे काम करताना काम सुरू असल्याचे सांकेतिक चिन्ह व फलक लावले नाहीत. स्थानिक नागरीक आणि महामार्गावर प्रवास करणारे प्रवाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कसलीच उपाययोजना केली नाही.
अंत्यत हलगर्जीपणा आणि बेजाबदारपणे संबंधित ठेकेदाराकडून हे काम सुरू आहे. रस्त्यालगतच्या शेतकरांच्या हद्दीतून काम करताना अनेक शेतकऱ्यांनी या कामास विरोध दर्शवला आहे. मात्र तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या दबावतंज्ञाचा वापर करून हे काम सुरू आहे. तसेच टोलनाका कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक तोडजोड असल्यान टोल नाका कंपनीचे अधिकारी कारवाईकडे टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
संबंधित गॅस कंपनी आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, याबाबत पुणे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी सुहास चिटणीस यांच्याशी याबाबत विचारले असता ते म्हणाले की, महेश गॅस एजन्सी या खासगी कंपनीने परवानगी मागतिल्याने त्या कामास नियम व अटीवर मंजुरी दिली आहे. मात्र हे काम करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबत चौकशी करण्याचा सुचना करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करू.