दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई येथील सार्वजनिक बांधकाम वाई उपविभागाच्या वतीने पसरणी घाटामध्ये मोरीचे व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याने बुधवार (दि. 30 रोजी) वाहतुकीसाठी घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी कडे जाऊ इच्छिणाऱ्या व पसरणी गाठा मार्गे जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी अथवा प्रवाशांनी याची नोंद घेऊन पर्यायी मार्ग निवडावा.
पसरणी घाटातील साखळी क्रं.66 ते 70 मधील मोरी व संरक्षक भिंती अतिवृष्टीमुळे पडल्या आहेत. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. त्याची दुरूस्तीचे काम सध्या सुरू असून मोरीचे व संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी बुधवार दि. 30 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
या कालावधीत पाचगणी किंवा महाबळेश्वरकडे जाणार्या वाहनधारकांनी पसरणी घाट रस्त्याचा उपयोग न करता पाचवड- मेढामार्गे महाबळेश्वर किंवा पाचवड, कुडाळ, पाचगणी मार्गे महाबळेश्वर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.