इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी अंकुश मिळवला असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने आरोग्याबाबतची तयारी परिपूर्ण असावी, यासाठी इंदापूर तालुक्यात उपाययोजनांवर भर दिला जात आहे. रुग्णांना भविष्यात ऑक्सिजन ची करतरता भासू नये यासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते काल रविवारी याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार अनिल ठोंबरे, डाॅ.एस.यू.देशपांडे निवासी वैद्यकीय अधिकारी औंध, डाॅ. पी. एस. कांबळे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक,वैद्यकिय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी रामराजे कापरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनिल गावडे, डाॅ.सुहास शेळके, डाॅ.विनोद राजपुरे, डाॅ.नामदेव गार्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, आरोग्य सभापती अनिकेत वाघ यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान राज्यमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात दोन रुग्णवाहिकांचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.शिवाय लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने माहिती पुस्तिकाचे ही अनावरण करण्यात आले.दरम्यान यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी उपजिल्हा रूग्णालयात लहान मुलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सुसज्ज विभागाची ही फिरुन पाहणी केली.
यावेळी भरणे म्हणाले की, अनेक तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली असून अनेक देशांत ती दिसून येत आहे. तिसऱ्या लाटेपासून मुलांना धोका व्यक्त केला जात आहे. अशा स्थितीत लहान मुलांची काय काळजी घ्यावी यासाठी इंदापूर आरोग्य विभागाकडून माहिती पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पुस्तिकेचे घरोघरी वाटप केले जाईल.
आशा सेविका, अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी त्याविषयी माहिती दिली जाईल. कोरोनाची पहिली लाट पाहिली, दुसरी लाट झाली आता तिसरी लाट डोळ्यासमोर दिसत आहे. कोरोना अद्याप हद्दपार झालेला नाही. त्यासाठी शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन करा. आपला जीव आपल्या कुटुंबासाठी लाख मोलाचा असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यासाठी उपाययोजना म्हणून इंदापूर तालुक्यात 23 खाजगी रूग्णालयात 283 बेड च्या सुविधा निर्माण केल्या आहेत. तर शासकीय रुग्णालयात 137 बेड निर्माण करण्यात आले आहेत. इंदापूर उपजिल्हा रुग्णालय व निमगांव केतकी ग्रामीण रुग्णालयास दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.
उपजिल्हा रूग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला असून याची क्षमता 150 mpl इतकी आहे. टाटाच्या सी.एस.आर.फंडातून याची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पातून दिवसाला 50 मोठे सिलेंडर ऑक्सिजन निर्माण केला जाणार आहे.
15 -20 बेडवरील रूग्णांना एका वेळी या प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो किंवा 5 व्हेंटीलेटर वरील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो. लवकरच भिगवण,बावडा व निमगांव केतकी या ठिकाणी सी.एस.आर. फंडातून अशाप्रकारे प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. दोन महिन्यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मीठ स्वतः इंदापूर आरोग्य यंत्रणेतील रिक्त जागांबाबत त्या भरण्याची मागणी केली होती. त्यास मंजूरी मिळाली असल्याने लवकरच त्या जागी कर्मचारी भरले जातील असेही भरणे यांनी स्पष्ट केले.