संदिप मापारी पाटील, बुलढाणा
ही घटना आहे वाशिम जिल्ह्यातील… भावातील प्रेमाचं नातं आजही विभक्त कुटुंबात किती टिकून आहे आणि एवढेच नाही गावांमध्ये मित्रत्वाचं नातं देखील कसं तीव्र आहे याची प्रचिती देणारी ही घटना….!
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सोयोजना या गावातील जनार्दन पवार यांना किडनीचा विकार होता. नागपूर येथे उपचार झाल्यानंतर गावाकडे निघालेल्या जनार्दन पवार यांचा वाटेतच यवतमाळ जवळ त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मृत्यूची घटना ऐकून त्यांचे धाकटे भाऊ 73 वर्षीय मुरली पवार यांना हृदयविकाराचा धक्का आला.
त्यांना यवतमाळकडे उपचारासाठी नेत असताना त्यांचाही वाटेतच मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूची बातमी गावात कळाली, तेव्हा गावातील त्यांचे मित्र धनंजय कोल्हे यांना हृदयविकाराचा झटका आला. मात्र तो एवढा तीव्र होता की, त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
एका दिवशी गावात तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली, तर त्यापेक्षाही मित्र आणि भावाच्या या अद्वितीय नात्याची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यात झाली.