दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विविध फळझाड रोपविक्रीस सुरुवात केली. त्याचा शुभारंभ कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, मधुकर शिंदे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे सभासद अनिल वाघमळे, निरंजन गाडे, ऋषिकेश भोईटे, अक्षय पवार, प्रतिक तरडे यांना वृक्ष देऊन शुभारंभ करण्यात आला.
किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व विविध संशोधन केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना दर्जेदार फळरोपे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर उपलब्ध करून दिलेली आहेत. लोकसहभाग व सभासदांच्या सहभागातून गेल्या सतरा वर्षामध्ये कारखाना कार्यक्षेत्रात २ लाख २५ हजारापेक्षा जास्त विविध फळरोपांची विक्री व लागवडीची चळवळ उभारण्यात आलेली आहे.
केसर, रत्ना, हापूस, सिंधु, मल्लिका, वनराज, दुधपेढा या जातीचे आंबा, बाणवली, ऑरेंज डॉर्फ, ग्रीन डॉर्फ या जातीचे नारळ, एनएमके १ सिताफळ, कालीपती चिकू, पीकेएम, थायलंड चिंच, सरदार, तैवान पिंक पेरू, साई सरबती लिंबू कोकण बहाडोली जांभूळ आणि कोकण बोल्ड करवंद अशा विविध फळझाड रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रारंभी वृक्षांचे विधीवत पुजन संचालक चंद्रकांत इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सभासदांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत फळरोपे विक्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी चंद्रकांत इंगवले यांनी केले. यावेळी सेक्रेटरी एन. एन. काळोखे, सुरक्षा अधिकारी एस. एम. बर्गे, जयवंत साबळे, भरत बाबर, सयाजी निकम, विशाल सावंत, प्रसाद जायकर व शेतकरी सभासद उपस्थित होते.