माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – कोरोना महामारीच्या काळात भोर तालुक्यातील आदिवासी बांधव, मजुरी करणारे, तमाशा कलावंत, विधवा महिला तसेच निराधार व्यक्ती अशा गरजवंताना किराणा कीट, आरोग्य कीट, शैक्षणिक मदत, जीवनावश्यक वस्तू वाटप करून विधायक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि सेवाभावी व्यक्तीची भोर तहसीलदार अजित पाटील यांनी दखल घेत घेतली असून लेखी शुभेच्छा, प्रशंसापत्र देत त्यांचा गौरव महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
शिवरे ( ता. भोर ) येथील धनेश डिंबळे, डॉरबिट फाउंडेशनचे मिलिंद इंगुळकर, तसेच सह्याद्री फाउंडेशनचे संतोष धावले यांनी वंचीत घटकांना मदत केल्याबद्दल त्यांचा नसरापूर ( ता. भोर ) येथे भोर तहसीलदार अजित पाटील यांनी दिलेल्या प्रशंसापत्र देऊन महसूल विभागाचे अधिकारी व राजगड पोलीस अधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडॆ, पोलीस हवालदार कुंडलिक माने, संतोष तोडकर, महिला पोलीस तृप्ती लामटे, दिलीप कडुसकर, समीर घाटनेकर, निशा धावले, शिवरेचे माजी सदस्य दीपक खंडागळे, अजिंक्य हाडके, शुभम कुडले, लिंबाजी कोळपे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना नसरापूर येथील ओमकार फूड मॉलच्या वतीने मिठाई बॉक्स देण्यात आले.
मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली म्हणाले कि, या महामारीच्या काळात नसरापूर येथील स्थानिक पत्रकार यांच्या माध्यमातून मिलिंद इंगुळकर, पै. धनेश डिंबळे आणि संतोष धावले यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून अशा उपक्रमासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी धनेश डिंबळे म्हणाले की, आजकाल वेळ वाया न घालवता तातडीने कृतीतून कार्य करणे गरजेचे आहे. निराधारांना मदत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर झळकले समाधान पाहण्यात इतर कोणताही आनंद नसल्याचे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.
मिलिंद इंगुळकर यांनी आगामी काळात विद्यार्थीसाठी शैक्षणिक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती दिली. तर संतोष धावले यांनी संस्थेचे कार्याची माहिती देत असे विधायक उपक्रम राबविण्यात स्थानिक पत्रकार यांचा मोठा खारीचा वाटा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार किरण भदे, सूत्रसंचालन माणिक पवार तर वैभव भुतकर यांनी आभार मानले.
अजित पाटील, तहसीलदार – डॉरबिट फाउंडेशनचे मिलिंद इंगुळकर, पै. धनेश डिंबळे आणि सह्याद्री फाउंडेशनचे संतोष धावले यांनी केलेली मदत अनमोल आहे. निश्चितच कोरोना काळात त्यांनी माणुसकीला उजाळा दिला आहे. असे कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शहानिशा करून प्रशंसापत्र देण्यात आले.