इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पाठीमागे सोलापूरमधील उजनीच्या पाण्याचे आंदोलन तापले असताना इंदापूर तालुक्यातील सोशल मिडियावरील एका ग्रुपवर पालकमंत्र्यांच्या विरोधात कोणी पोस्ट करू नका, हा त्यांचा समर्थकांचा ग्रुप आहे, अशी तंबीच राष्ट्रवादीच्या एका कट्टर कार्यकर्त्याने दिली होती…त्यानंतर आज मात्र इंदापूर तालुक्यात एक क्लिप फिरू लागली आहे, अर्थात त्यावेळी एवढी चर्चा झाली नव्हती, कारण तो एक सामान्य कार्यकर्ता होता, आता मात्र बड्या राजकीय पदाधिकाऱ्याची ही क्लीप असल्याने त्याची चर्चा अधिक होताना दिसत आहे, ज्यामध्ये आपल्याच संस्थेतील एक शिक्षक विरोधक असलेल्या दत्तात्रेय भरणे यांची पोस्ट ग्रुपवर पोस्ट करीत असल्याचा या पदाधिकाऱ्यास राग आला आहे..!
इंदापूर तालुक्यातील राजकारण गेल्या काही महिन्यांपासून राजकीय स्तरावरून व्यक्तीगत स्तरापर्यंत खालावलेले आहे. त्यातून गावागावात कधी नव्हे ते नगरी टाईप राजकारण उफाळून येऊ लागले आहे. राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील हे राजकारण नेमके कसे आहे याची प्रचिती देणारी क्लिप कालपासून इंदापूर तालुक्यात सोशल मिडियावर व्हायरल होते आहे.
यामध्ये कोणत्या तरी संस्थेतील शिक्षक हा राज्यमंत्री भरणे यांच्या नावाची कोणती तरी लिंक पोस्ट करीत असल्याबद्दल या राजकीय युवा नेत्याने या शिक्षकाला विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर या शिक्षकाने याच नेत्याला फैलावर घेतल्याचा संवाद यामध्ये आहे. अर्थात यामध्ये या पदाधिकाऱ्याची मस्ती जशी दिसते, तसाच शिक्षकाचाही उर्मठपणा या क्लिपमधून ऐकायला मिळतो आहे. त्याची खुमासदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
तुम्ही भरणे यांची पोस्ट कशी केली? असा प्रश्न या युवा नेत्याने करताच हा शिक्षक समोर ये, तुला सांगतो असे प्रत्युत्तर देत असून या नेत्याने अहोजाहोचीच, परंतू मग्रुरीची भाषा वापरत, तुम्ही या संस्थेत काम करता, शिक्षक आहात आणि विरोधकांची पोस्ट करता असा सवाल केला आहे. यावर तरीही या शिक्षकाने अरेतुरेचीच भाषा केल्यानंतर या नेत्याने अरे, तुरे? असा प्रतिप्रश्न केला.
त्यावर तुझ्याएवढे मला नातू आहेत असे उत्तर देत शिक्षकाने या युवा नेत्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत या संवादात तुम्ही मला भेटायला या असे आवाहन नाही, आव्हान हा युवा नेता देताना ऐकायला मिळत असून समोरून ही शिक्षक म्हणवली जाणारी व्यक्तीही त्या संवादात त्या नेत्याला समोर ये, इथेच ये असे आव्हान तेवढ्याच जोशात देताना ऐकायला मिळत आहे.
कारण काहीही असले, तरी राजकारण हे वैयक्तिक शत्रुत्वाचे नसावे, ते विचारांपुरतेच मर्यादीत असावे हा संकेत आता इंदापूर तालुक्यात पायदळी तुडवला गेला आहे. यात फक्त भाजप किंवा राष्ट्रवादी असा भेदभाव करता येणार नाही अशी स्थिती आहे, गावागावातील हा वाद हळूहळू व्यक्तीद्वेषावर पोचला आहे.
या स्थितीचा नेमका फायदा सरकारी अधिकारी, कर्मचारी घेत असून यात सामान्यांची पिळवणूक होऊ लागली आहे. सामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत, याकडे कोणाचेच लक्ष नाही, याउलट मीच कशी विरोधकांची जिरवली याच थाटात सारे कामकाज सुरू आहे.