राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील तब्बल 29 ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची विज बिले मागील अनेक वर्षापासून भरली गेली नाहीत. परिणामी कोट्यवधी रूपयांची वीज बिले थकीत आहेत. ही थकीत वीज बिले वसूलीसाठी दौंड महावितरण कंपनीने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा आणि पथदिव्यांची वीज पुरवठा तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
वीज बिले भरल्याशिवाय वीज जोड करणार नाही, असा पावित्रा महावितरण कंपनीने घेतला आहे. परिणामी वीज तोड केलेल्या अनेक गावांमधील पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने ऎन पावसाळ्यात नागरीकांचे पाण्यासाठी हाल होत आहे.
नागरीकांकडून घरपट्टी आणि वीजपट्टी सक्तीने वसुली केली जाते हे पैसे नेमके जातात कुठे असा प्रश्न आता ग्रामपंचायतीच्या कारभारावर गावागावातील नागरीक विचारत आहेत. मागील काही दिवसांपासून थकीत वीज बिल न भरणाऱ्यांच्या विरोधात दौंड महावितरणने आक्रमक भुमिका वीजजोड तोडण्याचा सपाटा लावला आहे.
पाणी पुरवठा योजना, गावातील रस्ते,चौक तसेच विद्युत खांबावरील पथदिवे यासाठी ही विजजोड घेतले आहेत. यांचे वीज बिल ग्रामपंचायतीना भरणे बंधनकारक आहे. मुळात ही विज बिले ग्रामपंचायत प्रशासन भरत असले तरीही ग्रामस्थांच्या घरपट्टी, पाणी आणि वीजकर अशा विविध करांमधून आकारली जाते. मात्र नागरीकांनी हे कर आकारूनही ग्रामपंचायतीने ही विज बिले वेळवर का भरली नाहीत, कोट्यावधी बिले का थकवली ? असा प्रश्न यानिमित्ताने गावागावातील नागरीक आता ग्रामपंचायतीना विचारत आहेत.
दौंड तालुक्यातील पाटस,बेटवाडी, नानवीज, सोनवडी, गिरीम, खोरवडी, आलेगाव, मलठण, गोपाळवाडी, लिंगाळी, बोरीबेल, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, शिरापुर, पेडगाव, वडगाव दरेकर, वाटलुज, नायगाव, राजेगाव, यवत, कासुर्डी, भरतगाव, खामगाव, बोरीऎंदी, ताम्हाणवाडी, सहजपुर, डाळींब, बोरीभडक,नांदूर या एकुण 29 ग्रामपंचायतीने कोट्यावधी रूपयांचे बिले थकविली आहेत.
ही बिले भरण्यासाठी महावितरण कंपनीने वारंवार ग्रामपंचायतीना कळविले आहे. मात्र तरीही ग्रामपंचायतीने ही वीज बिले भरण्यास टाळटाळ केली. त्यामुळे अखेर महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारांनी थकीत बिल असणा-या ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा आणि पथदिव्यांचा विजपुरवठा तोडून तो बंद केला आहे.
वीज बिल भरा..महावितरणला सहकार्य करा….
दरम्यान, याबाबत दौंड महावितरण वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता जीवन ठोंबरे (दौंड ग्रामिण ) म्हणाले की, अनेक ग्रामपंचायतींनी मागील अनेक वर्षापासून वीज बिले भरली नाहीत. कोट्यावधींची थकबाकी आहे. काही ग्रामपंचायती नियमीत वीज बिले भरतात मात्र, काहींची मागील अनेक वर्षाची थकबाकी आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकीत वीज जोड तोडण्याचे आदेश दिले आहेत. वीज बीले भरल्याशिवाय वीज जोड केली जाणार नाही. ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर विज बिले भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन जीवन ठोंबरे यांनी केले आहे.