सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
छत्रपती खासदार उदयनराजे यांना गुंड म्हटल्याबद्दल ज्या इंदापुरातील उद्योजकाला सात जणांनी बेदम मारहाण करून त्याची धिंड काढली; त्या अशोक जिंदाल या उद्योजकाच्या मुलानं फिर्याद देताना या घटनेमागील पडद्यामागील सत्य उलगडून दाखवलं आहे.. कंपनीतील भंगाराच्या कंत्राटासाठी दहशत माजवत हा प्रकार करण्यात आल्याचा स्पष्ट आरोप या मुलानं त्याच्या फिर्यादीत केला आहे. यामध्ये दीपक काटे व त्याच्या सहकाऱ्यांनी तीन लाख रुपयांचे रोख रकमेसह साडेपाच लाख रुपयांची चोरी केल्याचा देखील आरोप या मुलाने केला आहे.
दरम्यान एकीकडे छत्रपती खासदार उदयनराजे यांना अपशब्द वापरल्याबद्दल केलेल्या या मारहाणीचं कौतुक शिवभक्तांमध्ये असतानाच; दुसरीकडे पोलिसांनी मात्र अत्यंत तत्परतेने इंदापुरात कायद्याचं राज्य असल्याबाबतचा जो निर्वाळा दिला, त्यावरून पोलिसांचेही कौतुक केले जात आहे.
इंदापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमागे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अत्यंत चपळाईने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, दिलेल्या आदेशाचीही चर्चा सध्या इंदापूरसह पुणे जिल्ह्यात सुरू आहे. डॉक्टर अभिनव देशमुख हे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक झाल्यापासून त्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत, गुन्हेगारीला व्यसन घालण्याची दमदार पावले टाकली आहेत.
त्यांच्या या ॲक्शन मोडमुळे एका वर्षात 50 हून अधिक गुन्हेगारांच्या टोळ्या तुरुंगात गेल्या आहेत. काल देखील इंदापुरात जो प्रकार झाला, त्या प्रकरणाच्या मुळाशी जाईपर्यंत वाट पाहत बसण्यापेक्षा, समोर जे दिसते ते कायद्याला मान्य नाही, ही धारणा ठेवून पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी अत्यंत वेगाने सात जणांवर तिथल्या तिथे कारवाई केली. यामुळे देखील पुणे पोलिसांचे सामान्य नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.
उद्योजक परप्रांतीय असला म्हणून त्याचा द्वेष करायचा या प्रथेकडे भावनिक होण्यापेक्षा डोळस नजरेने पाहिले पाहिजे. अनेक कंपन्या त्या त्या भागात सुरू होताना त्या कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्ट, भंगार मालाचे, वाहनांचे कॉन्ट्रॅक्ट, उत्पादनाच्या वाहतुकीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी त्या त्या भागातील राजकीय नेत्यांचे बगलबच्चे प्रयत्न करतात. हे प्रत्येक तालुक्याचे दुर्दैव आहे. आणि अशा प्रकारचे कंत्राटदार प्रत्येक तालुक्यात आहेत.
काही तालुक्यांमध्ये तर एमआयडीसीमध्ये अशा बगलबच्च्यांनी उद्योगाचे गुन्हेगारीकरण करून ठेवले आहे. इंदापुरात देखील असाच प्रयत्न होता का? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे आणि त्याला निमित्त घडले आहे, उद्योजक अशोक जिंदाल यांचा मुलगा रोहित!
रोहित जिंदाल याने इंदापूर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीमध्ये दीपक सिताराम काटे व त्याचे इतर सहा साथीदार गेल्या वर्षभरापासून कंपनीचे लेबर कॉन्ट्रॅक्ट व भंगाराचे साहित्य उचलण्यासाठी भेटत होते, तसेच गेल्या काही दिवसांपासून हे कॉन्ट्रॅक्ट मिळत नसल्याचे पाहून धमकी देत होते असे नमूद केले आहे. 24 जून रोजी देखील संध्याकाळी सात वाजता दीपक काटे यांनी लोणी देवकर एमआयडीसी चौकात वाट पाहत थांबून मी व माझे वडील तसेच कंपनीचे मॅनेजर सुहास बद्दी व चालक मेहबूब उल्ला असे चौघेजण असताना चौकात अडवून खाली उतर असे सांगून गचांडी धरून गाडीतून बाहेर खाली काढले.
वरील लोकांनी मारहाण केली. माझे वडील व मला मारहाण करून वडिलांचा चष्मा पाडला व आमच्या गाडीच्या उजव्या बाजूच्या दोन्ही दरवाजाचे नुकसान केले. तसेच गाडीच्या समोरील काचेची नुकसान करून, गाडीचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान केले व माझ्या वडिलांचा मोबाईल आदळून नुकसान केले. माझ्या वडिलांच्या अंगावरील कपडे फाडून तोंडावर काळे रंगाचे केमिकल फेकले व मोठ्याने शिवीगाळ करून त्यांनी माझ्या वडिलांना त्यांच्याकडील चार चाकी गाडीत जबरदस्तीने घालून, इंदापूर पोलिस स्टेशनला आणले असे रोहित याने फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून पोलिसांनी जोरदार कारवाई केली.