विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : बेकायदेशीरीत्या वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी करणाऱ्या दोन आरोपींवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दोन ट्रक सह सुमारे १४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. १५८ मध्ये बुधवारी (दि. २३) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
दोन्ही ट्रकचे मालक बंडू विठ्ठल सुरवसे (वय २९) व ट्रकचालक तात्या शिंदे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीरीत्या वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी तहसीलदार कोलते यांनी उरुळी कांचनचे मंडल अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी निवृत्तीनाथ गवारी, प्रदीप जवळकर आणि कोतवाल सुरेश शेलार यांचे महसूल विभागाचे पथक तयार करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने महसूल विभागाचे पथक पुणे-सोलापूर महामार्गावर तपास करीत असताना त्यांना सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. १५८ मध्ये बुधवारी (ता. २३) रात्री ८ च्या सुमारास दोन वाळूने भरलेले ट्रक निदर्शनास आले.
पथकाने जवळ जाऊन पाहणी केली असता, त्यांना दोन्ही ट्रकच्या मागील हौदात प्रत्येकी ५ ब्रास वाळू भरलेली होती. आणि त्या ट्रकमधील वाळू धुण्याचे काम चालू होते. वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन ट्रकसह सुमारे १४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.