विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह
पुणे : नऱ्हे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ललवाणी मेटॅलिक्स प्रायवेट लिमिटेड आणि ललवाणी फेरो ऑलाईज लिमिटेड या कंपनीचे गोदामाचे शटर उचकाटून चोरट्यांनी गोदामातील फेरोमोली, निकेल, अॅल्युमिनियम लॉच आणि इतर साहित्य असा सुमारे ६२ लाख ५२ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. मात्र, सिंहगड पोलिसांनी २४ तासाच्या आत चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून त्यातील एका आरोपीला अटक केली आहे.
शरद विठल दारवडकर (वय २०, रा. वेल्हा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटॅलिक्स प्रा.लि. आणि ललवाणी फेरो. ऑलाईज लि. या कंपनीचे नऱ्हे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गोदाम आहे.
या कंपनीच्या गोदामाचे शटर उचकाटून अज्ञात चोरट्यांनी गोदामातील फेरोमोली, निकेल, अॅल्युमिनियम लॉच आणि इतर साहित्य असा सुमारे ६२ लाख ५२ हजार रुपयांचा माल चोरून नेला असल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २५) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्य दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणून चोरट्यांना पकडण्यासाठी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक थोरबोले व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले.
सदर पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तपासदरम्यान पोलिसांना शरद दारवडकर याच्याविरुद्ध संशयितरीत्या माहिती एका खबऱ्याने दिली. पोलिसांनी शरद याला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, शरद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी टेम्पोमधून ६२ लाख ५२ हजार रुपयांचा माल चोरून नेला असल्याची कबुली दिली आहे. तरी, पुढील तपास सिंहगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.