विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्तीत १६ जून २०२१ रोजी दुपारी दीड वाजता भारती विठ्ठल भाडळे या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन अज्ञात चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेले होते. भरदिवसा गुन्हा घडल्याने हडपसर पोलिस सतर्क झाले.. पोलिसांनी तातडीने चक्रे हलवली. तेव्हा सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरटे हे झोमॅटो कंपनीतील डिलिव्हरी बॉय असल्याचे निदर्शनास आले… त्यावरून तपास लावून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी १ लाख ९७ हजारांच्या मंगळसूत्राच्या चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी या प्रकरणी आकाश सिध्दलिंग जाधव (वय २३ वर्षे, धंदा झोमॅटो डिलिव्हरी, रा. जहागीरनगर, साज कंपनीसमोर शिंदेवस्ती हडपसर), विजय जगन्नाथ पोसा (वय २२ वर्षे, धंदा स्विगी डिलिव्हरी, लेन नंबर ४, तुळजाभवानीनगर खराडी, पुणे), साहिल अनिल गायकवाड (वय २२ वर्षे, धंदा जीम हाऊसकिपर, मु.पो. सावरखेड, ता. सोलापूर) या तिघांना अटक केली.
या तिघांनी मिळून यापूर्वी १९ जून रोजी देखील चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारच्या वेळी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरल्याचे निष्पन्न झाले. २१ जून रोजी झोमॅटोची डिलिव्हरी दिल्यानंतर निर्मल सोसायटीतून बाहेर पडताना एक ज्येष्ठ महिला दिसल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली या तिघांनी दिली. आकाश जाधव हा या टोळीचा म्होरक्या होता. दरम्यान या प्रकरणात आणखीही चोऱ्या उघड होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.
१६ जून रोजी घटना घडल्यानंतर अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याण विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाने हा तपास केला. पोलिस निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड, फौजदार सौरभ माने, हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पाडूळे, शाहिद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.











