पडळकरांच्या दौंड दौऱ्याला धनगर समाजानी दिली साद; भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मात्र फिरवली पाठ..
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाने राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. या आघाडी सरकारने जाणीवपूर्वक एसी आणि एसटी प्रवर्गाचे पदोन्नती आरक्षण रद्द केले आहे. फुले शाहु आंबेडकर यांचे नाव घेणारे आणि पुरोगामी चे टिमकी मिरवाणारे हे सरकार बहुजन आणि आरक्षण विरोधी आहे. अशी टिका भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा शुक्रवारी ( दि.18 ) दौंड तालुक्यात नियोजित दौरा होता. या दौऱ्याला तालुक्यातील धनगर समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र या दौऱ्यास दौंड भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे आमदार पडळकर यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाजप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दौंड तालुक्यातील नागरीकांशी संवाद साधण्यासाठी आज शुक्रवारी ( दि.18) तालुक्यातील केडगाव, चौफुला, एकेरीवाडी, नाथाचीवाडी, वाळकी, टेळेवाडी, डुबेवाडी, सहजपुर, वरवंड, पाटस, मळद, रावणगाव आणि मलठण आदी गावांमध्ये घोंगडी बैठका घेतल्या. यावेळी अनेक ठिकाणी पडळकर यांची घोड्यावरून मिरवणुक काढण्यात आली. या घोंगडी बैठकीत नागरीकांच्या विविध प्रश्न, अडी अडचणीबाबत संवाद साधला. यावेळी नागरीकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पडळकर यांनी दिले.
आमदार गोपीचंद पडळकर नागरीकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, तात्कालीन भाजप सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण या आघाडी सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले यास हे आघाडी सरकारच जबाबदार आहे. ओबीसी समाजासाठी अतिरिक्त आरक्षण ही न्यायालयाने रद्द केले.
या दोन्ही आरक्षणाबाबत आघाडी सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही. केवळ या आघाडी सरकारच्या नाकार्तेपणामुळेच न्यायालयात हे आरक्षण टिकले गेले नाही. असे असतानाही स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या या सरकारने राज्यातील एस सी आणि एसटी समाजाचे पदोन्नती आरक्षण ही रद्द केले आहे. हे आघाडी सरकार जातीवादी आणि आरक्षण विरोधी आहे.
तत्कालीन भाजप सरकारने धनगर समाजाला २२ योजना व 1 हजार कोटीचे बजेट दिले होते. मात्र या आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. धनगर समाजाला ही आरक्षणाचे गाजर दाखविले. धनगर समाजाने आरक्षणासाठी पुन्हा एकदा अखेरचा लढा उभारला पाहिजे.असे मत आमदार पडळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
आमदार पडळकरांच्या या दौऱ्यास गावागावातील तरूण कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, दौंड तालुक्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपली ताकद उभी करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना माननारा मोठा वर्ग आमदार पडळकर यांच्या या दौ-यात सामील झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
पडळकर यांच्या आक्रमक आणि परखड भुमिकेळे तरूण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. भविष्यात जानकर यांच्या पक्षाला दौंड तालुक्यात मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.











