दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या हेतूने वाई येथील अर्पण ग्रुपच्या वतीने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हजारो सीड बॉल तयार करण्यात आले आहेत.
मानवाच्या आसुरी हव्यासामुळे पर्यावरणाचे संतुलित चक्र तुटले असून यांचे अनेक दुष्परिणाम दिसू लागले असून यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. कोरोनाच्या महासंकटात ऑक्सिजनचे महत्व व गरज संपूर्ण जगाला कळाली. आपल्याला मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे महत्व ही त्यामुळे कळले आहे. यासाठी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करणे हा एकमेव उद्देश ठेवून वाई येथील अर्पण ग्रुप सरसावला आहे.
वाई शहराची सुसंस्कृती आणि पर्यावरण यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या अर्पण ग्रुप ने पुन्हा एकदा, पर्यावरणात चांगले बदल घडवून आणण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे . पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि नवनवीन झाडे येण्यासाठी अर्पण ग्रुप ने “सीडबॉल मेकिंग” हा उपक्रम हाती घेतला आहे.यामध्ये माती आणि शेणखत यांचे मिश्रण करून त्यांचा गोळा केला जातो व त्यामध्ये कोणत्याही झाडाची बी टाकली जाते. हे गोळे वाळवून ठेवले आणि पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या अगोदर योग्य ठिकाणी टाकले की त्यापासून नवनवीन झाडांची निर्मिती होते. बहुतेककरून गिर्यारोहणाला (ट्रेकिंग) जाणारे लोक सीडबॉल ला पसंती दर्शवितात.
आतापर्यंत अर्पण ग्रुप ने तीन हजारहून अधिक सिडबॉल्स बनवले आहेत. त्यामध्ये गुलमोहर,जांभूळ, चिंच, सीताफळ अशा छायावर्धक व फळ झाडांच्या बियांचा समावेश आहे. या कार्यात अर्पण ग्रुप चे सर्व सदस्य पंकज खागे, प्रतिक सरकाळे, निखिल कारळे, चेतन अनपट, आर्यन गायकवाड, प्रतीक गायकवाड , मंदार पाचंगे, मृणाल गव्हाणे, विद्या जमदाडे, सोहम देशमाने, साहिल देशमाने, मितेश महांगडे, अनिकेत गाढवे या सर्वांचे योगदान आहे.
सीडबॉल्स बनविण्याचे हे कार्य सातत्याने चालू ठेवण्याचा अर्पण ग्रुपचा मानस आहे. तसेच सीड बॉल्स बनविणे ही फार सोपी कृती असून प्रत्येकाने यथाशक्ती हे सीडबॉल्स बनवावेत व पर्यावरणात वाव असेल तिथे टाकावेत असे आवाहन या ग्रुपकडून केले जात आहे. सध्या त्यांनी बनविलेल्या सीडबॉल्स पैकी बरेच सीडबॉल्स या ग्रुप तर्फे वाई जवळील डोंगराळ ठिकाणी टाकले गेले आहेत .
प्रतिक सरकाळे – सदस्य अर्पण ग्रुप : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून आपल्याला अविरत ऑक्सिजन देणारी झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आम्ही लॉक डाउनचा सदुपयोग करून सीडबॉल तयार करण्याचा संकल्प केला. वाई च्या परिसरातील डोंगरावर हे सीडबॉल आम्ही टाकणार आहोत. तरुणांना मोकळा वेळ विनाकारण मोबाईलवर न घालवता विधायक काम केले पाहिजे.