विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह
पुणे : पुणे आणि नगर जिल्ह्यात दुचाकी चोऱ्या करून धुमाकूळ घातलेल्या एका अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खोडद (ता. जुन्नर) येथून रविवारी (ता. १३) अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या ११ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सिद्धार्थ रमेश बर्डे (वय-२१, रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
आरोपीस पकडण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर आणि मुकुंद कदम यांचे पथक तयार करण्यात आले.
त्यानुसार सदर पथकाने गुन्ह्याचा तपास करीत असताना जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. सदर पथकातील पोलिसांनी एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, खोडद (ता. जुन्नर) या गावात काही इसम कामधंदा न करता वारंवार विविध प्रकारच्या मोटारसायकल वापरत आहेत.
पोलिस रविवारी (ता. १३) या ठिकाणी गेले असता, आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
मग पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने अधिक चौकशी केली असता, त्यातील एकाने त्याचे सिद्धार्थ रमेश बर्डे असे नाव सांगितले. तसेच त्याने ११ दुचाकींची चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे ४ लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपीसोबत एक अल्पवयीन मुलाचाही यात सहभाग आढळला आहे. दरम्यान सिद्धार्थ बर्डे याने पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात दुचाकीच्या चोरी केलेल्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.











