दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड, शिरूर तालुक्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. २ लाख २० हजार किंमतीच्या पाच दुचाकी या चोरांकडे मिळून आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने ही कामगिरी केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय नितीन काळे (वय २० वर्षे, रा. गणेगाव दुमला, ता. शिरूर) व त्याचा साथीदार प्रशांत सतीश भोसले (वय २० वर्षे, रा खोरवाडी ता.दौंड) यांना पोलिसांनी अटक केली.
हे दोघे जण चोरीच्या मोटारसायकल विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून या आरोपींना पकडण्यासाठी तैनात केले. या पथकाने दौड पोलिस स्टेशन हद्दीत काष्टी रोडवर सापळा रचून दोन दुचाकी चोरांना ताब्यात घेतले. ५ दुचाकींची त्यांनी चोरी केली, त्यातील चार दुचाकी या व्यंकटेश या व्यक्तीस विकल्याचे कबुली त्यांनी दिली.
चोरीच्या दुचाकी घेणारा व्यंकटेश फ्रराव कंटसाला (वय २७ सध्या रा खातगाव भिगवण जि पुणे मूळ रा अगडालंका वेस्ट गोदावरी राज्य आंध्र प्रदेश) यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिन्ही आरोपींकडून २ लाख २० हजार किंमतीच्या ५ दुचाकी आणि मुद्देमाल हस्तगत केला असून या आरोपींना दौंड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस नाईक विजय कांचन, राजू मोमिन, पोलीस शिपाई अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, पूनम गुंड, दगडू विरकर आदींच्या पथकांनी ही कामगिरी केली आहे.











