संपादकीय
कोरोनाने राज्यात ३७ हजार १३६ चा आकडा गाठला आहे. १३२५ जणंचा मृत्यू झाला आहे आणि या महाभयानक संकटात दिलाशाची बाब ही की, ९६३९ जणांनी या कोरोनावर मात करून महाराष्ट्राला भक्कम पाठबळाचा संदेश दिला आहे. पण या संकटाच्या काळात भयावह झालेल्या जनतेला दिलासा देण्याचे काम व्हायला हवे. ते होत असेलही, पण सगळीकडे एक अनास्थेचे वातावरण मात्र नक्कीच आहे. राज्यातील २५ लाख परप्रांतिय मजूरांनी स्थलांतरासाठी मागणी केली. काही लाख जणांच्या परवान्यांचा प्रश्न मार्गी लागला. उर्वरित हजारो जणांनी वाट फुटेल तसे चालण्यास सुरवात केली. आजही हजारो जण मिळेल तशा मार्गाने आपला मार्ग एकला समजून आपापल्या राज्यात परत चालले आहेत. परप्रांतिय त्यांच्या राज्यात चालले आहेत, अशावेळी महाराष्ट्रातील सोशल मिडियातून आता आपण जागे व्हा, त्यांच्या जागा पटकवा असे संदेश दिले जात आहेत. हे संदेश वाचून प्रत्येकाची छाती भरून यावी अशीच या संदेश पाठविणाऱ्यांची अपेक्षा असेल. अर्थात तसे असायला काहीच हरकत नाही. मात्र जेव्हापासून वांद्र्याच्या गर्दीचा प्रश्न सुरू झाला, तेव्हापासून का कोणास ठाऊक, महाराष्ट्राच्या प्रगती रोखण्याचे, मुंबईचे महत्व कमी करण्याचे अतिशय जाणीवपूर्वक व नियोजनपूर्वक प्रयत्न सुरू आहेत याची शंका येऊ लागली.
मुंबईतील आयएएफसीचा मुद्दा बरोबर १ मे रोजी समोर आला. मुंबईतल्या बीकेसी संकुलात इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर अर्थात जागतिक वित्तीय केंद्र (आयएफएससी) उभारण्याचा प्रस्ताव होता. तो सन २००६ मध्येच मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी एक आर्बिट्रेशन सेंटरही सुरू करण्यात आलं होतं. मात्र आता हे केंद्र गुजरातमध्ये गांधीनगरमधील प्रस्तावित गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजे गिफ्ट सिटीमध्ये हलविण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. साहजिकच मुंबईतून हे केंद्र हलविण्य़ात आल्याने येथे निर्माण होऊ पाहणारे रोजगार, मोठा महसूल व मुंबईचे महत्वही आता महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या या केंद्रामुळे कमी होणार आहे.
मुंबई कोणाला खुपतेय?
मुंबई सातत्याने दिल्लीला खुपते. आधीच्या आघाडी सरकारने एअर इंडियाचे मुख्यालय दिल्लीला हलवले होते. त्यानंतर मोदी सरकारने तर जबरदस्त हालचाली केल्या. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला, नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकेत तर पोर्ट ट्रस्ट मधील शिप रेकिंगचे काम गुजरातमधील अलंगला नेण्यात आले. अशाप्रकारे मुंबईचे सातत्याने डिसमँटल करण्यात आले. सांगायचा मुद्दा हा आहे की, मुंबई अनेकदा महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न झाला, तो येनकेनप्रकारे हाणून पाडण्यात महाराष्ट्र नेहमीच यशस्वी झाला. आता परिस्थिती बदलली आहे.
कोरोनाने घात केलाय
आता कोरोनाने मात्र महाराष्ट्राचा घात केला आहे. गंमत म्हणजे जे परप्रांतिय महाराष्ट्रासाठी घातक आहेत, अडचणीचे आहेत असे आपण सारे एका हाकाटीने बोलत होतो. ते परप्रांतिय पहिल्यांदाच महाराष्ट्रातून स्वतःहून जाण्यासाठी धडपडत होते. या परप्रातियांविषयी आपल्या साऱ्यांच्या मनात नेहमीच एक अढी दडून राहीली आहे. मध्यंतरी देखील हे सारे घडत असताना पश्चिम बंगालमधील असनसोल रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ की, जो पाच वर्षापूर्वीचा आहे, तेथील व्हिडीओ दाखवून हा महाराष्ट्रातून उत्तरप्रदेश, बिहारमध्ये जाणाऱ्या परप्रांतियांचा आहे, त्यांनी जाताना दिलेले भोजन फेकून दिले, बघा कसे माजोरडे आहेत असे दाखवून समाजमन बिघडविण्याचा प्रयत्न केला. (मात्र दोन, तीन दिवसांनंतर हा व्हिडीओ खोटा आहे हे लक्षात येताच स्थिती पूर्वपदावर आली आणि रस्त्याने जाणाऱ्या परप्रांतियांसाठी भोजनाची व्यवस्था याच महाराष्ट्रातील गावागावातील लोकांनी केली) मात्र परप्रांतिय त्यांच्या गावाला निघून गेले. बहुतांश जण निघून गेले. भीतीपोटी निघून गेले. अशी स्थिती का आली? त्याचे उत्तर ७ मे च्या केंद्र सरकारने पाठवलेल्या आरोग्य पथकामध्ये दडलेले आहे. या पथकाने महाराष्ट्रात आल्यानंतर अचानकच एक अंदाज वर्तवला. अमुक दिवसापर्यंत मुंबईत ४ लाख कोरोनाबाधित असतील! हा आकडा जाहीर करण्यामागे नेमके काय कारण असावे? त्यावेळी कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र आज जे परप्रांतिय निघून चाललेत, त्यावरून हा अंदाज पक्का बांधणे शक्य आहे. या परप्रांतियांच्या म्हणजे मुंबईत कष्ट करणाऱ्या श्रमिकांच्या मनात भीती निर्माण करायची होती. ती भीती आपोआपच शक्य झाली. या भीतीने श्रमिकांनी आपला बांडबिस्तरा गुंडाळला. नेमके हे कधी होतेय पहा.. जेव्हा चीनमधील बहुराष्ट्रीय उद्योग चीनमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत आहेत, तेव्हा हे सारे घडवले जात होते. मुंबईतून हे श्रमिक माघारी परतले, तर महाराष्ट्रातील ग्रामीण किंवा निमशहरी भागातील तरुण हा फर्निचरची, बांधकाम क्षेत्रातील अवजड जागेवरची, कारखान्यातील वजन उचलण्याची जेवढी म्हणून अवजड कामे आहेत, ती करतील अशी अपेक्षा कशी धरणार? आपण परप्रांतिय म्हणजे रस्त्यावरचे स्टॉल, भाजीवाला अशी जी दिखाऊ कामे आहेत, त्यापुरतेच मर्यादित मानतो. पण या श्रमिकांच्या तळहातावर मुंबईचे महात्म्य टिकून आहे, तो परप्रांतिय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पडेल ती कामे करतो. त्यांच्या या कामाची भागीदारी करण्यास महाराष्ट्रातील तरुणांना तयार करावे लागेल. जे आता तातडीने शक्य नाही. तर मुद्दा असा की, हे परप्रांतिय आता आपापल्या घरी, गावी गेले आहेत. तेथे त्यांना काय मिळेल, पोटापुरते मिळेल का? हा प्रश्न आपल्याला पडतोय, त्या राज्यातल्या कारभाऱ्यांना पडत नाही. कारण आता ही कुशल कामगारांची फौज त्यांच्या राज्यात विनासायास पोचली आहे. त्यांना कसेही राबवून घेता येईल व चीनमधून येणाऱ्या उद्योगांसारखे अनेक उद्योग तेथे नेऊन आपल्या राज्याला त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मुलाखत पाहिली असेल तर त्यांच्या हे लक्षात येईल. म्हणूनच आता परप्रांतिय गेलेत, म्हणून मुंबईची एक कष्टाची बाजू लंगडी झालीय हे नक्की! त्य़ातून लॉकडाऊन उठल्यानंतरही ही देशाची राजधानी पूर्वपदावर लवकर येऊ नये यासाठी केलेला नियोजनपूर्वक प्रपंच मुंबईनगरीचे अवसान गाळायला कारणीभूत ठरेल.
एकूणच महाराष्ट्राची अस्मिता जागी होते, वेळोवेळी होते, म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा सातत्याने द्वेष होतो ही अनेक शतकांपासूनची परंपरा आहे. आजही चालू आहे. आता देखील तोच प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राचा घात होतोय हे लक्षात येत असतानाही केवळ राजकीय द्वेषातून येथे राजकारण खेळले जात आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातीलच लोक आपसात भांडत असल्याने देशातून महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा नियोजनपूर्वक प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुढे कोणीच येत नाही. दिल्लीतून एक टास्क दिला जातो आणि त्या टास्कधाऱ्यांचे कार्यकर्ते दररोज वेगवेगळ्या अडवणूकीचा धंदा बाळबोधपणे पार पाडतात. तेव्हा मात्र संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या महात्म्यांच्या आत्म्याला देखील हेची फळ काय मम तपाला असे वाटत असेल अशी भावना तयार होते. आता काळरात्र होत आली आहे, तेव्हा उद्याचा उषःकाल पुन्हा तेजाने व्हावा असे वाटत असेल तर हे महाराष्ट्रावरचे षडयंत्र हाणून पाडायला हवे आणि त्यासाठी आता ग्रामीण, निमशहरी भागातून प्रशिक्षण केंद्रे करून तरुणाईची ताकद राज्याच्या औद्योगिक कार्यासाठी उभी करावी, पडेल ते काम करण्याची तयारी दाखविणारी मुले आता महाराष्ट्रात घरोघरी तयारी करताना पाहायला मिळावीत, तरच महाराष्ट्रद्वेषाचा लाल टोमॅटोचा चिखल होईल, अन्यथा जे आज दिसते आहे, तोच आपला भविष्य़काळ असेल…!












Absolutely right analysis by the author.Thoght provoking article.
Absolutely right analysis by the author.Thought provoking article.