सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
एक जून या तारखेला अनेक नागरीकांचा वाढदिवस असतो. सरकारी शाळांमधील सुरुवात आणि गुरुजींच्या आशीर्वादाने अनेकांचा हा वाढदिवस बनला असून त्याला सरकारी वाढदिवस देखील गमतीने म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी अनेकांचा वाढदिवस असतो. कालही इंदापूर नगरपरिषदेच्या जवळपास १५ कर्मचा-यांचा वाढदिवस होता… वाढदिवसाला होणाऱ्या अनाठायी खर्चास फाटा देत या १५ कर्मचा-यांनी आपल्याजवळील प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे १५ हजार रूपये गोळा केले. त्या पैशातून त्यांनी विविध प्रकारच्या फळांची रोपे आणली. आणि नगरपालिकेच्या जैवविविधता क्षेत्रात ती रोपे लावून वाढदिवस साजरा केला..
मंगळवारी इंदापूर नगर परिषदेने नव्याने निर्माण केलेल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये इंदापूर नगरपरिषदेच्या १५ कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचारी बापू मखरे, अशोक आडसुळ, सुधीर पारेकर, दीपक शिंदे, तानाजी चव्हाण, तानाजी पुंड याांनी स्वखर्चाने पेरू, आंबा, लिंबू, रामफळ, सीताफळ, चिंच, कवट, गुलाब, मोगरा व इतर आयुर्वेदिक वृक्षांची लागवड केली.
आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता व सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनावश्यक खर्च टाळून पंधरा हजार रुपये जमा करून सदर वृक्षांची लागवड केल्याने कर्मचा-यांचे कौतुुुुक होत आहेे. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्या ठिकाणी केक कापून वाढदिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा केला.
तसेच ३१ मे २०२१ रोजी नगरपरिषदेमधून सेवानिवृत्त झालेले पाणीपुरवठा पर्यवेक्षक सहदेव व्यवहारे, अशोक शहा, श्रीमती आशा ईश्वर चव्हाण या कर्मचाऱ्यांनीही सेवापुर्ती निमित्त रोपे आणून त्याचे वृक्षारोपण केले व आपली सेवापूर्ती अविस्मरणीय केली. सदरचा कार्यक्रम इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, मुकुंद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
त्यानंतर सरस्वतीनगर येथील पाण्याची टाकी येथे इंदापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षास हार घालून मोहन शिंदे यांच्या वाढदिवसाबरोबरच सदर वृक्षाचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यानंतर तेथे गुलाब व मोगरा यांची २५ झाडे लावण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे सभा अधीक्षक गजानन पुंडे, प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर, नोडल ऑफिसर गोरक्षनाथ वायाळ, सतीश तारगावकर, आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, सहायक आरोग्य निरीक्षक सुनील लोहिरे, अविनाश बर्गे, मुकादम दत्तात्रेय ढावरे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.











