निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचेकडून सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न- रामभाऊ वाघमारे
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पोलिस ठाण्याशेजारील मातंग वस्तीतील महिलांना मानवी व जनावरांची विष्टा, घाण, कचरा गोळा करायला लावल्याची तक्रार झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी रविवारी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला भेट दिली व तक्रारदार महिला, अन्यायग्रस्त महिला व लहान बालके, पुरुष यांचे म्हणणे ऐकून घेतले व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचा पदभार काढून घेऊन त्यांचा पदभार करमाळा विभागाचे पोलिस अधिकारी विषाल अहिरे यांच्याकडे देण्यात आला.
दरम्यान 48 तासात या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सर्व दलित संघटनांना आश्वासन दिले.
राजकुमार केंद्रे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सर्व दलित संघटनांनी केलेली आहे. जर कारवाई नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शनिवारी महिलांवर अमानवी कृती करायला लावल्याचे प्रकरण स्वतःच्या अंगलट येताच पोलीस वसाहत येथील निवासी पोलिसांच्या पत्नींची ढाल करून आपल्या बचावासाठी त्याचा वापर करण्याचा प्रकार दुर्दैवी व सामाजिक आणि जातीय निर्माण करणारा आहे. समाजात भेदभाव व संघर्ष याची विषवल्ली पेरू पाहणारी प्रवृत्ती राजकुमार केंद्रे यांची असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत टेंभुर्णी येथील कार्यकर्ते मातंग एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी मांडले आहे
वाघमारे म्हणाले की, वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज पोलीस ठाण्याच्या शेजारी वस्ती करून राहत आहे. प्रत्येकाचे घरी शौचालय आहेत. कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याच्या सोयी आहेत. आजवर असा प्रसंग कधी उद्भवला नव्हता. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कारवाईत जप्त केलेली वाहने वसाहतीच्या दिशेला ठाण्याच्या आवारात उभी असतात. या वाहनांमध्ये त्यांचे मालक ड्रायव्हर क्लीनर असतात. त्यांचेसाठी संडास बाथरूमची कसलीही सोय नाही. या लोकांनी अनेक दिवसांपासून तेथे केलेली घाण त्या अनुषंगाने जमणारी जनावरे, त्यांची विष्ठा, वाऱ्या वादळात उडालेला कचरा पोलिस वसाहतीमधील कचरा गोळा करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी धाकटदपशा दाखवत गरीब दलित मातंग महिला व युवकावर अन्याय अत्याचार करत ही घाण गोळा करायला लावून स्वतःच्या मस्तवाल व हुकूमशाही वागण्याचे प्रदर्शन घडवले आहे. अशा प्रवृत्तीच्या वय व्यक्तीस संविधानिक पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असेही वाघमारे यांनी सांगितले.
पोलीस ठाण्याचे आवार स्वच्छ असावे याबद्दल दुमत नाही पण त्यासाठी कडक लॉकडाऊन असताना गावाचे निर्बंध लागू असताना जमाव एकत्र करून त्यांचेकडून अमानवी कार्य करून घेणे बेकायदेशीर आहे. पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी केलेले “मी महिला बोलवल्या नाहीत, त्या स्वतःहून आल्या, त्यांना जबरदस्ती केली नाही,” असे खुलासे हास्यास्पद आहेत. त्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर केलेला आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. आपला बचाव करण्यासाठी केंद्रे अजून पुढे कुठल्याही पातळीला जाऊन सामाजिक व जातीय निर्माण करण्याची शक्यता आहे. मानवी हक्क व संरक्षण आयोगाने या गंभीर प्रकाराची दखल घेणे गरजेचे आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी स्वतः पोलिस ठाण्याला भेट देऊन पीडित महिला व नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले 48 तासात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच्या आश्वासनामुळे या प्रकरणी आवाज उठवलेल्या सामाजिक संघटना शांत आहेत. मात्र पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी जो बचावाचा प्रयत्न चालू केला आहे, त्यातून सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याची चिन्हे आहेत असा आरोप रामभाऊ वाघमारे यांनी केला आहे.
वरिष्ठांनी याप्रकरणी वेळीच योग्य ती पावले उचलावी अन्यथा या प्रकरणाला वेगळे वळण लागून सामाजिक शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. तरी राजकुमार केंद्रे यांचेवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी वाघमारे व नितीन कांबळे व सर्व दलीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी तेथील अन्यायग्रस्त युवक नितीन कांबळे म्हणाले, राजकुमार केंद्रे खोटे बोलत आहेत. त्यांनी महिलांना मानवी विष्ठा उचलायला लावली, झाडू मारायला लावले, गटारी साफ करायला लावल्या. या प्रकरणी त्यांनी प्रत्येक पत्रकारांना मीडियाला वेगवेगळी उत्तरे दिली आहेत.
काहीवेळा तर त्यांनी सांगितले की, आम्ही महिला बोलवल्या नव्हत्याच. महिला स्वतःहून आल्या होत्या. परंतु काल सोमवारी दिवसभर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ रविवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दाखवण्यात आली आहे. यावरून राजकुमार केंद्रे हे खोटे बोलत असून बेबनाव करत आहेत हे सिद्ध होत आहे, असेही अन्यायग्रस्त युवक नितीन कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.











