खंडाळा : महान्यूज लाईव्ह
टीव्हीवरच्या ‘नवे लक्ष्य’ या लोकाभिमुख काम करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला साजेशी वास्तव कामगिरी लोहमार्ग पोलिसांनी केली. कर्नाटकातून रेल्वेत बसलेल्या लष्करातील जवानाने आठ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तेव्हा विरोध करणाऱ्या मुलीला त्याने रेल्वेतून फेकून दिले. जखमी मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी बेमालूमपणे तपास करत ‘द बर्निंग ट्रेन’ प्रमाणे भुसावळपर्यंत रेल्वे थांबू न देता आरोपीला ताब्यात घेतले…!
अत्यंत थरारक कामगिरी आज 1 जून रोजी घडली. लोणंद रेल्वे स्टेशन मार्गावर रेल्वे ट्रॅकवर आठ वर्षाची एक लहान मुलगी जखमी अवस्थेत स्थानिक लोकांना मिळून आली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील पोलीस फौजदार तारडे व त्यांचे कर्मचारी यांनी लोणंद ते सालपा रेल्वे स्टेशन गाठले.
जखमी मुलीची अवस्था पाहिल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलगी बोलण्याच्या अवस्थेत नव्हती, मात्र डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या मुलीने डॉक्टरांना माहिती दिली. आई, वडील, भाऊ आणि बहिण असे चौघेजण गोव्याकडून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेने काल गोव्याहून निघाले होते. रात्री जेवण करून रेल्वेत झोपल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने उचलून या मुलीला रेल्वेच्या बाथरूम मध्ये नेले.
त्या ठिकाणी तिच्या अंगावरचे कपडे काढत असताना तिला अचानक जाग आली. तिने आरडाओरडा केला. तेव्हा त्या व्यक्तीने तुला आईवडिलांकडे नेतो असे सांगत रेल्वेच्या दरवाज्यातून बाहेर फेकून दिले. ही माहिती या मुलीने पोलिसांना देताच पोलीस अधीक्षक सदानंद वळसे-पाटील संतप्त झाले. त्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याच्या व आरोपीला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्याचे आदेश दिले.
त्यावरून रेल्वेच्या संबंधित मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांना सूचना देण्यात आल्या. व सर्व बोग्या बंद करून पोलीस कर्मचारी हे संशयितांचा शोध घेत रेल्वे न थांबवता 50 ते 80 किलोमीटरपर्यंत प्रवास करून मुलीने सांगितलेले वर्णनाप्रमाणे लोकांना ताब्यात घेत होते. चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यापैकी एकाने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याचे नाव प्रभू मल्लाप्पा उपहार (वय 33 वर्ष) हा लष्करामध्ये झाशी येथील 182 युनिटमध्ये नाईक या पदावर आहे. ही घटना गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस या रेल्वे मध्ये घडली. पोलिसांनी केलेली कामगिरी अतुलनीय असल्याने लोहमार्ग मुंबईच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी सर्वांचे कौतुक केले.
पुण्याचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस निरीक्षक मौला सय्यदळ भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सरडे व तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कामगिरीने हा तपास पूर्णत्वाला गेला.











