दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील बावधन ग्रामपंचायतीने स्वयंस्फूर्तीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी आवश्यक सोईसुविधांसह २५ बेडचे विलगीकरण केंद्र उभारले आहे.
बावधन प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना तराळ यांच्या देखरेखीखाली हे केंद्र तयार केले आहे. त्याची पाहणी सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी करुन समाधान व्यक्त केले. एकट्या बावधन गावात आजपर्यंत २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यभर प्रसिद्ध असलेल्या बगाडामुळे हे गाव चर्चेत आले होते.
बावधन गावात एप्रिल मध्ये ३६१; मे मध्ये १६६
असे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून आजअखेर
बावधन गावात २१ जणांसह परिसरातील गावांमधील ९ रुग्ण असा ३० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टर योजना तराळ यांनी दिली आणि
जिल्हाधिकाऱ्यांना धक्काच बसला. या
विलगीकरण कक्षात रुग्णांसाठी काय काय सुविधा आहेत याची माहिती उपस्थित सरपंच
शुभांगी कांबळे, उपसरपंच उदयसिंह पिसाळ
यांच्याकडून त्यांनी घेतली.
जिल्हाधिकारी या नात्याने माझ्याकडून तुम्हाला काय मदत अपेक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या वेळी उपस्थितांनी आरोग्य केंद्रात अपुरा असणारा कर्मचारी वर्गासह डॉक्टर्स ऊपलब्ध करुन देण्याची मागणी या वेळी केली.
डॉ. तराळ यांना बावधनच्या घराघरातील नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या करुन रुग्ण संख्या निश्चित करावी व रूग्णांना येथील विलगीकरण कक्षात दाखल करावे तरच आपल्याला मृत्यूचा आकडा थोपविण्यास यश प्राप्त होईल असे तोंडी आदेश जिल्हाधिकारी यांनी बोलताना दिले आहेत.
त्याचबरोबर येथील दक्षता समितीने पुढे येवून नियमांचे ऊलंघन करुन मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले तरच गावा मधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल असेही खडे बोल जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सुनावले.
या वेळी वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, पंचायत समिती सदस्य दिपक ननावरे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप यादव, माजी सभापती दिलीपराव पिसाळ, वहिवाटदार चंद्रकांत भोसले, ग्रामपंचायत सदस्य तानाजी कचरे, विवेक भोसले, सुरज कदम, संतोष भोसले, पृथ्वीराज कचरे, जगदीश कांबळे, दिगंबर रासकर, रवीद्र किर्वे, मंडल अधिकारी सचिन जाधव, ग्रामविस्तार अधिकारी शिवाजी दरेकर, तलाठी श्रीकांत धनवडे, गोपनीय विभागाचे मदने आणि बावधन गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.











