ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
नंदुरबार जिल्ह्यातील सोनू शिंदे या तरुणीची संपूर्ण टोळीच पोलिसांनी उघडकीस आणली असून ही टोळी लग्नाचं नाटक करून नवरदेवाला लुटत होती. तब्बल तेरा लग्न झाल्यानंतर पोलिसांनी सबंध प्रकरण खणून काढलं आणि पोलिसांनी ही टोळी उघडकीस आणली.
नंदुरबार सह धुळे, जळगाव, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये लग्न जुळवणारी ही टोळी धुमाकूळ घालत होती. सोनू शिंदे नावाच्या या टोळीतील तरुणीने याकरता तब्बल बारा जणांसोबत अगोदर लग्न केले आणि तेराव्या मुलाशी लग्न करताना ती पोलिसांच्या हाती सापडली.
ज्यांना मुली मिळत नाहीत अशा तरुणांसोबत ही मुलगी लग्न करत होती. विशेष म्हणजे यामध्ये लग्न जुळण्यासाठी एक टोळी सक्रिय होती. लग्नासाठी विदर्भामध्ये मुली मिळत नाहीत, या कारणावरून वरपक्ष वधू पक्षाला हुंडा देऊ लागला आहे किंवा लग्नासाठी काही रक्कम देऊ लागला आहे. त्याचा गैरफायदा घेत ही टोळी सक्रिय झाली होती. नंदुरबार पोलिसांकडे शहादा तालुक्यातील मंदाने गावातील एका कुटुंबाने या संदर्भात तक्रार दिली. मंदाने गावातील एका तरुणाशी या सोनु शिंदेने लग्न केले. मात्र लग्न केल्यानंतर ती लागलीच पळून गेली. या लग्नासाठी तरुणाच्या कुटुंबीयांनी या टोळीकडे लाखाची रक्कम दिली होती.
मात्र वधु पळाल्याने प्रतिष्ठा व आपल्याला फसवले आहे हे लक्षात घेऊन या कुटुंबाने शहादा पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर सुरुवातीला अगदी सहज प्रकरण आहे, असे वाटणाऱ्या पोलिसांना यातील एक एक कहाण्या कळाल्या आणि पोलिसांनी कपाळाला हात मारला. यादरम्यान पोलिसांना संबंधित तरुणी ही शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाशी लग्न करणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला. मात्र हे लग्न अमळनेर तालुक्यात होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी अमळनेर तालुक्यातील संबंधित लग्नाच्या ठिकाणी गुप्तपणे सापळा रचला. तेथे मात्र पोलिसांनी सोनू शिंदे ला पकडलं.