माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – कोरोनाला आळा घालण्यासाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन सरकार, आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलिसांकडून केले जात आहे; पण काहींना याचे गांभीर्य नसल्याने अखेर नसरापूर (ता. भोर) येथील बाजारपेठ रस्त्यावर राजगड पोलिसांनी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करून दुचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्याचा दंडुका उगारला आहे. यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील यांनी भोर तालुक्यात कडक पावले उचलली असून त्यानुसार राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभारी विलास देशपांडे यांनी नसरापूर बाजारपेठेत हद्दीत धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली.
पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्या बहाद्दरकडून ५०० रुपये दंड आकाराला जात आहे. दंड न भरल्यास दुचाकी जप्त केली जात आहे. यावेळी मात्र गरोदर महिला, तसेच अत्यावश्यक बाबीसाठी बाहेर पडणाऱ्यांना शहानिशा करून सोडले जात असल्याने अनेकांनी पोलिसांच्या माणसातील माणुसकीचे दर्शन अनुभवले हे विशेष!
नसरापूर येथील मुख्य चौकात आज (सोमवार) पासून दुचाकी जप्त आणि दंडात्मक कारवाई करण्याची सुरुवात राजगड पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार कुंडलिक माने, प्रमोद भोसले, अजित माने, महेश खरात, गोपनीय विभागाचे भगीरथ घुले, संतोष दावलकर व होमगार्डचे संजय काळे, देवेंद्र बांदल आदींनी प्रत्यक्षात कारवाई करून तब्बल दुचाकी जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, राजगड ठाण्याच्या हद्दीत कायद्याचा भंग करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येत असून परिसरात पोलिस कर्मचारी गस्त घालत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
खेडशिवापूर हद्दीत सुद्धा सर्व व्यापारी आणि दुकानदार आणि नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे यापूर्वीच सूचना दिलेल्या असून कोणत्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत नागरिकांनी सुद्धा अत्यावश्यक काम असल्यास तोंडावर मास्क घालूनच घराहेर पडावे. अन्यथा वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई करणार असल्याची माहिती उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी दिली.











