बारामती : नरेंद्र मोदी तिकडे देशभरात एनआरसी व सीएए कडे लक्ष वेधून देशातील वाईट परिस्थितीपासून लक्ष दुसरीकडे वळवत आहेत, तर मागील पाच वर्षात राज्यातही देवेंद्र फडणवीस सरकारने बोलघेवडेपणाशिवाय काहीच केले नाही अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
चव्हाण म्हणाले,मागील पाच वर्षे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी व भ्रष्टाचार वाढला. राज्यात कोणताही मोठा प्रकल्प वाढवला नाही. फडणवीस सरकारने फक्त जाहीरातबाजी केली. देशात सीएए आणून सरकार देशाच्या संविधानावर हल्ला चढवत आहे. अगोदरच नोटबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला अडचणीत आणले असून आता ज्या पद्धतीने एनआरसी आणि सीएए कायदा केला जात आहे, त्यामुळे देशात विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आल्याचे खापर निर्मला सिताराम यांच्यावर फोडलं जात आहे. आंतरराष्ट्रीय सल्लागार यांचा सल्ला न घेतल्याने देशाची अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे.










