सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज मध्यरात्रीपासून सात दिवस संपूर्णतः लोक डाऊन राहणार आहे 17 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन चा कालावधी राहणार आहे. यादरम्यान तालुक्यात कोणत्या सेवा सुरू राहतील आणि कोणत्या बंद राहतील याची देखील नियमावली प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जाहीर केली आहे.
यानुसार सर्व मेडिकल दुकाने दवाखाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा 24 तास सुरू राहणार आहे. त्याचबरोबर न्यायालय, राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, तसेच शासनाची अंगीकृत उपक्रमाची कार्यालये नियमानुसार कर्मचारी वर्ग सुरू राहतील. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आवश्यकतेप्रमाणे उपस्थित राहतील. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय निमशासकीय कार्यालयांना हे लॉकडाऊन आदेश लागू राहणार नाहीत. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम चा पर्याय वापरण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी सात ते सकाळी नऊ या वेळेतच करावे लागणार आहे. पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेपर्यंत सुरू राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनांना इंधन पुरवठा करतील. एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण नियमानुसार सुरू राहील. निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासकीय नियमानुसार सुरू राहील.
वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई तसेच डिजिटल व प्रिंट मिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरू राहतील. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील. सर्व राष्ट्रीयीकृत बँका,प्रशासकीय कामकाजाकरिता तसेच वैद्यकीय सुविधा जसे की ऑक्सिजन पुरवठा, मेडिकल व्यवहार इत्यादी सर्व सुरू राहतील. मात्र नागरिकांसाठी त्या बंद राहतील.
सर्व वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, पॅरा मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका यांना वाहतुकीसाठी परवानगी राहील. त्यांना पासची वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. इंदापूर तालुका व नगर परिषदेच्या हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रात कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर व कोरोना दवाखान्यामध्ये रुग्णासाठी जेवण नाश्ता पुरवणाऱ्या व्यक्ती, खानावळ चालक यांना फक्त डबा पोहोच देणे कामी प्रवासाची मुभा राहील.
सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना व कार्यालय पूर्ण बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक व सार्वजनिक प्रार्थनास्थळे व सभा पूर्णतः बंद राहतील. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच ई कॉमर्स सारख्या सेवा 17 मे 2021 पर्यंत पूर्णतः बंद राहतील. इंदापूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील अत्यावश्यक सेवा मधील दवाखाने व मेडिकल वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने शॉपिंग मॉल्स व गर्दी होण्याची ठिकाणे 17 मे 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर सर्व व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने 17 मे 2021 पर्यंत पूर्णतः बंद राहतील. तसेच झोमॅटो, स्विगी, डोमिनोज अथवा तत्सम ऑनलाइन पोर्टल वरून मागवले जाणारे खाद्यपदार्थ देखील संपूर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारची उद्याने, मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बगीचे बंद राहतील व सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक अथवा इविनिंग पूर्णतः बंद राहील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, मार्केट, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा पूर्णतः बंद राहील.
सर्व किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे, आडत, भाजी मार्केट, फळविक्रेते, आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची दुकाने संपूर्णतः बंद राहतील. मटन, चिकन, अंडी, मासे हे देखील पूर्णतः बंद राहील. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने पूर्णतः बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने व पूर्व परवानगी घेतलेली वाहने वगळता तसेच वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी फक्त खाजगी वाहनांचा वापर वापरास परवानगी राहील.
इंदापूर शहरातील 17 ठिकाणी रुग्ण संख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आली आहेत या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ आरोग्यविषयक सुविधा म्हणजेच दवाखाने व मेडिकल सुरू राहतील 17 मे 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे लोक डाऊन चे नियम लागू राहणार आहेत.











