माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – भोर तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत नसल्याने भोर नगरपालिका सह ग्रामीण भागातील सहा गावे हाय अलर्ट घोषित करण्यात आली असून पाच गावांना सावधानतेचा इशारा म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ती घोषित केली आहेत. या संदर्भात अधिकारी व नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या असून, त्याचे पालन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी भोर नगरपालिका संगमनेर माळवाडी, भोंगवली, कापूरहोळ, केळ वाडे, कासूर्डी कुस गाव ही गावे हाय अलर्ट घोषित केले आहे. तर रुग्ण संख्या कमी होत नसल्याने नसरापूर, शिवरे, ससेवाडी, शिंदेवाडी, वेळू या मोठ्या गावांना अलर्ट गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गावांव्यतिरिक्त इतर गावे हाय अलर्ट किंवा अलर्ट घोषित करावयाची असल्यास किंवा कमी करावयाची असल्यास तसेच त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करावयाचे असल्यास त्याचे सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना देण्यात आले आहेत.
तसेच वरील सर्व ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय अधिकारी यांनी भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सर्व गावस्तरीय समित्या कार्यन्वित कराव्यात व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच अलर्ट गावांमध्ये लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल याप्रमाणे नियोजन करण्याचे व पोलीस विभागाने कडक गस्त करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त गावातील नागरीकांनी बाहेर पडू नये, आरोग्यविषयक कामकाज असेल तरच शक्यतो बाहेर पडावे. सहव्याधी असणारे नागरीक तसेच ज्येष्ठ नागरीक यांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा अन्यथा आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम – २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.











